सर्कि ट बेंचचा ठराव मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करू ;
By Admin | Published: March 27, 2015 12:26 AM2015-03-27T00:26:26+5:302015-03-27T00:29:13+5:30
मुख्यमंत्री फडणवीस: खंडपीठ कृती समितीशी चर्चा
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्कि ट बेंच’ कोल्हापुरात स्थापन व्हावे, या मागणीसाठी उच्च न्यायालयाच्या सर्व अटींची पूर्तता केली जाईल, तसेच विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा ठराव करून तो उच्च न्यायालयाकडे पाठविला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडपीठ कृती समितीला गुरुवारी दिली.
गेल्या सहा महिन्यांपासून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले होते. सर्किट बेंचच्या मागणीसाठी राज्य मंत्रिमंडळ ठराव करेपर्यंत पालकमंत्री पाटील यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढून धरणे धरण्याचा, मुंबई येथे लाँग मार्चने जाऊन लाक्षणिक उपोषण करण्याचा तसेच महालोकन्यायालयाचे कामकाज बंद पाडण्याचा निर्णय कऱ्हाड येथील खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. याची तातडीने दखल घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृती समितीला मुंबईत बैठकीचे निमंत्रण दिले. त्यानुसार पालकमंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीच्या शिष्टमंडळाने विधानभवनात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी आपण उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा व राज्यपालांना पत्र दिल्याचे सांगितले होते; परंतु हे पत्र अद्याप कोणालाच पोहोचले नसल्याचे निदर्शनास आले आहे. फक्त पत्राने ही मागणी पूर्ण होणार नाही, त्यासाठी ‘कोल्हापूर’चा उल्लेख करून मंत्रिमंडळाचा ठराव झाल्याखेरीज ही मागणी पूर्ण होणार नसल्याचे सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या मागणीसाठी उच्च न्यायालयाच्या सर्व अटींची पूर्तता केली जाईल. तसेच याप्रश्नी मंत्रिमंडळासमोर विषय ठेवण्यास मंजुरी दिली असून, अधिवेशन संपल्यानंतर होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव करून तो उच्च न्यायालयाकडे पाठविला जाईल, अशी ग्वाही देत मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्याशी या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता अधिवेशनानंतर दोन आठवड्यांत करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
दरम्यान, मुख्य न्यायाधीश शहा यांचा कार्यकाल संपत आल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणली असता त्यांनी शासनाने सर्किट बेंचचा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय घेतल्याने त्यामध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नसल्याचे सांगितले. शिष्टमंडळात कृती समितीचे निमंत्रक अॅड. विवेक घाटगे, राजेंद्र मंडलिक, के. व्ही. पाटील, प्रशांत चिटणीस, बाबासाहेब पाटील, राजेंद्र पाटील, संपतराव पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, संदीप देसाई, किरण कुलकर्णी, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)