तृप्ती देसार्इंना कोल्हापूर बंद करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2017 12:47 AM2017-06-23T00:47:45+5:302017-06-23T00:47:45+5:30

महापालिका चौकात निषेधाच्या घोषणा : राजकीय पक्ष, माजी महापौर, कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचाही सहभाग

Let Trupti Deshites close Kolhapur | तृप्ती देसार्इंना कोल्हापूर बंद करू

तृप्ती देसार्इंना कोल्हापूर बंद करू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : रस्ते हस्तांतरणाचा ठराव मंजूर केल्यास महापौर हसिना फरास यांच्या तोंडाला काळे फासणार, अशा प्रकारचे महापौरांबद्दल अनुदार उद्गार काढणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना प्रसंगी ‘कोल्हापूर बंद’ केले जाईल, असा इशारा गुरुवारी महानगरपालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात झालेल्या आंदोलनावेळी देण्यात आला.
महापौर फरास यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याच्या निषेधार्थ गुरुवारी कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघातर्फे विठ्ठल रामजी शिंदे चौकात निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात काही राजकीय पक्ष, माजी महापौर, तसेच कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनीही भाग घेतला. सकाळी साडेअकरा वाजता निदर्शने सुरू झाली. ‘महापौरांचा अवमान करणाऱ्या तृप्ती देसार्इंचा धिक्कार असो,’ ‘तृप्ती देसाई कोण रे, पायताण मारा दोन रे’ अशा घोषणांनी चौक दणाणला. निदर्शनांनंतर चौकात निषेध सभाही झाली.
यावेळी बोलताना माजी महापौर महादेवराव आडगुळे यांनी महापौरांचा अवमान हा कोल्हापूर शहराचा अवमान आहे, असे सांगून महापालिकेच्या सभागृहात झालेल्या ठरावावर एवढी स्टंटबाजी करायची काही गरज नाही. जर त्यांना विरोध करायचाच असेल तर लोकशाही मार्गाने आंदोलन करावे किंवा न्यायालयात जाऊन दाद मागावी, असे त्यांनी आवाहन केले.
महापौर फरास यांच्याबद्दलचे अनुद्गार मागे घ्यावेत अन्यथा आमच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या महिला तृप्ती देसाई यांच्या केसांना कांदे बांधतील, असा इशारा माजी महापौर आर. के. पोवार यांनी दिला. महापालिकेतील ठराव मंजुरीची प्रक्रिया ही लोकशाही प्रक्रियेने झाली आहे. त्यात महापौरांचा दोष नाही. सभागृहाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापौरांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा म्हणजे केवळ स्टंटबाजी आहे. ती खपवून घेणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर यांनी दिला.
या आंदोलनात महापालिका मुख्य कार्यालयातील तसेच शिवाजी मार्केट कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. अधीक्षक पदाच्या वरील सर्व अधिकाऱ्यांनी यात भाग घेतला नाही. आंदोलनाचे नेतृत्व कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष विजय वणकुद्रे, बाबूराव ओतारी, दिनकर आवळे,अमित तिवले यांनी केले; तर उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती संदीप नेजदार, गटनेते शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक अशोक भंडारे, सुरेश जरग, किशोर घाडगे, बाबा पार्टे, अशोक पोवार यांनी त्यामध्ये भाग घेतला.
आयुक्त काय कारवाई करणार?
महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत राजकीय आंदोलन करू नये, असे आवाहन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी बुधवारी (दि. २१) सायंकाळी केले होते. महापौरांबद्दल अनुद्गार काढल्याच्या प्रकाराचे आपण समर्थन करणार नाही; परंतु कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत आंदोलन करू नये, असे आवाहन त्यांनी केले होते. तरीही कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. याबाबत आता आयुक्त काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Let Trupti Deshites close Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.