Kolhapur: ‘शक्तिपीठ’प्रश्नी शेतकऱ्यांना न्याय देऊ - संजय घाटगे; भाजपमध्ये केला प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 12:34 IST2025-04-16T12:32:58+5:302025-04-16T12:34:53+5:30

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच मेळावा

Let us explain the farmers' issues regarding Shaktipeeth to the government and provide justice says Sanjay Ghatge Joins BJP | Kolhapur: ‘शक्तिपीठ’प्रश्नी शेतकऱ्यांना न्याय देऊ - संजय घाटगे; भाजपमध्ये केला प्रवेश

Kolhapur: ‘शक्तिपीठ’प्रश्नी शेतकऱ्यांना न्याय देऊ - संजय घाटगे; भाजपमध्ये केला प्रवेश

कोल्हापूर : शक्तिपीठबद्दल शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. त्यासाठी आम्ही लढा सुरू केला. त्या भूमिकेमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आता आम्ही भाजपमध्ये म्हणजे सत्तेत आलो आहोत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासनाला आमचे प्रश्न समजावून सांगू आणि शेतकऱ्यांना न्याय देऊ, अशी प्रतिक्रिया माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी व्यक्त केली.

मुंबई येथील भाजप कार्यालयात मंगळवारी दुपारी त्यांचा आणि अंबरिश घाटगे यांचा उद्धवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश झाला. त्यानंतर त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचा मफलर गळ्यात घालून या दोघांसह सुयेशा घाटगे यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, विजय जाधव, संग्राम कुपेकर यांच्यासह घाटगे यांचे २०० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच मेळावा

हा प्रातिनिधिक स्वरूपात भाजप प्रवेश असून, लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये कागल तालुक्यात जाहीर मेळावा घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या प्रवेशावेळी याबाबतही प्राथमिक चर्चा झाली आणि प्रवेशानंतर घाटगे पिता-पुत्रांनी फडणवीस यांची भेट घेतली.

यांनी केले प्रयत्न..

घाटगे यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय झाला होता, परंतु त्यास पक्षाकडून फारसा प्रतिसाद नव्हता. म्हणून घाटगे यांचे व्याही अरुण इंगवले यांनी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या माध्यमातून त्यासाठी ताकद लावली. हाळवणकर यांनी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुढाकार घ्यायला लावून हा प्रवेश घडवून आणला आहे.

Web Title: Let us explain the farmers' issues regarding Shaktipeeth to the government and provide justice says Sanjay Ghatge Joins BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.