चला रक्ताची नाती जोडू या... ‘लोकमत’तर्फे शुक्रवारपासून रक्तदान मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:15 AM2021-06-30T04:15:59+5:302021-06-30T04:15:59+5:30
कोल्हापूर : रक्तदान म्हणजे जीवनदान आणि जिथे दातृत्वाचा विषय येतो तिथे कोल्हापूरकर कधीच मागे राहत नाहीत. कोल्हापूरवासीयांच्या याच दातृत्वाला ...
कोल्हापूर : रक्तदान म्हणजे जीवनदान आणि जिथे दातृत्वाचा विषय येतो तिथे कोल्हापूरकर कधीच मागे राहत नाहीत. कोल्हापूरवासीयांच्या याच दातृत्वाला साद घालत ‘लोकमत’च्यावतीने २ जुलै ते १५ जुलै या कालावधीत जिल्ह्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक, संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त या ‘लोकमत नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं’ अशी हाक देऊन ही महाशिबिरे होत असून नागरिकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी होत कोरोनाच्या या कठीण काळात रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
‘लोकमत’च्यावतीने दरवर्षी २ जुलैला रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि माणसं माणसांपासून दुरावली, रक्ताच्या नात्यांनाही परके व्हावे लागले, अशा काळात कोल्हापूरकरांनी मदतीसाठी उचललेले पाऊल राज्यासाठी आदर्श होते. महापूर असो वा कोरोनासारखी आपत्ती जिथे जिथे मदतीची गरज असते तिथे तिथे कोल्हापूरकर धावून जातात. कोरोनामुळे गेल्यावर्षभरात रक्तदानावर मर्यादा आल्या. लोक रक्तदानच काय पण घराबाहेर पडायलाही घाबरत आहेत. पण त्यामुळे विविध आजारांचा सामना करत असलेल्या गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासत आहे. नियमित रक्ताची गरज असेल अशा थॅलेसेमिया, सिकलसेल रुग्णांची गैरसोय होत आहे. गर्भवती मातांसह अपघातग्रस्तांना, आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची गरज असले या स्थितीत वेळेत रक्तदाता शोधणे व त्याचा रक्तगट जुळवणे हे अतिशय जिकिरीचे व वेळखाऊ काम आहे. शासकीय रक्तपेढीत आज रक्ताचा ठणठणाट आहे, त्यामुळे डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करतानाही अडचणी येत आहेत. सध्याच्या कठीण परिस्थितीत या रुग्णांना रक्तदानातून जीवनदान देण्यासाठी दात्यांनी पुढे येण्याची गरज आहे.
कोरोना महामारी व लसीकरणामुळे अनेकांची रक्तदानाची इच्छा असूनही मर्यादा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेतला आहे. यात आपला सक्रिय सहभाग नोंदवून रक्तदानाची लोकचळवळ उभी करण्यास पुढे यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
---
यांनी करावे रक्तदान
- १८ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्ती
- कोविड निगेटिव्ह झाल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येते.
- लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येते.
-दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करू शकता.
---
रक्तदानासाठी येथे संपर्क साधा...
‘लोकमत’च्यावतीने दहा दिवस जिल्ह्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात येत आहेत. ज्या नागरिकांना ग्रुपने तसेच संस्था, संघटना, तालीम, गणेश मंडळे, तरुण मंडळांना या महाअभियानात सहभागी व्हायचे असेल त्यांनी शिबिराच्या आयोजनासंदर्भात सचिन कोळी : ९७६७२६४८८५, विक्रांत देसाई : ९६३७३३०७०० यांच्याशी संपर्क साधावा.
----