यंदाचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साधेपणानेच, गुढी व भगवे ध्वज उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 04:37 PM2020-05-29T16:37:07+5:302020-05-29T16:42:53+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने घरासमोर गुढ्या, भगवे ध्वज उभारून साजरा करूया असे आवाहन मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले आहे. याविषयावर झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनंतर हा निर्णय घेण्यात आला.
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने घरासमोर गुढ्या, भगवे ध्वज उभारून साजरा करूया असे आवाहन मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले आहे. याविषयावर झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनंतर हा निर्णय घेण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून रोजी रायगडावर राज्याभिषेक सोहळा झाला होता. यानिमित्त रायगडावर मोठा सोहळा होतो. तर कोल्हापुरात पारंपारिक जल्लोषात मिरवणुकीसह विधायक उपक्रमांचे आयोजन केले जाते.
मराठा महासंघाच्यावतीने गेल्या १३ वर्षांपासून हा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र सध्या जगासमोर कोरोनाचे महासंकट असल्याने यंदाचा सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या परिस्थितीत ''''अखंड सावधानता'''' हा शिवरायांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्वाचा गुणच कोरोनविरुद्धच्या लढाईत देशाला जिंकण्याची स्फूर्ती देईल. तरी नागरिकांनी आपल्या घरावर गुढी व भगवे ध्वज उभारुन हा दिवस साजरा करावा असे आवाहन राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले आहे.
या ऑनलाईन बैठकीस इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, शशिकांत पाटील, बबन रानगे, शाहीर दिलीप सावंत, प्रकाश पाटील, अशोक माळी, कादर मलबारी, उत्तम जाधव, इंद्रजीत माने, आनंद म्हाळूंगकर, शंकरराव शेळके, शैलजा भोसले, के. एम. बागवान, उमेश पोर्लेकर, अवधूत पाटील, संजय कांबळे, शरद साळुंखे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.