शिवराज्याभिषेक सोहळा लोकोत्सव करूया
By admin | Published: May 12, 2017 01:12 AM2017-05-12T01:12:33+5:302017-05-12T01:12:33+5:30
मराठा महासंघाच्या बैठकीत निर्धार : प्रबोधनपर कार्यक्रम, विविध उपक्रमांचे आयोजनशिवराज्याभिषेक सोहळा लोकोत्सव करूया मराठा महासंघाच्या बैठकीत निर्धार : प्रबोधनपर कार्यक्रम, विविध उपक्रमांचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा लोकोत्सव करत तो जगभरात पोहोचविण्याचा निर्धार गुरुवारी अखिल भारतीय मराठा संघाच्यावतीने आयोजित बैठकीत केला. यानिमित्ताने सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन व्याख्यान, प्रबोधनपर, पर्यावरणपूरक कार्यक्रम, शिवरायांच्या कार्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे, शिस्तबद्ध मिरवणूक अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
शाहू स्मारक भवन येथे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक होते. यावेळी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, शशिकांत पाटील, बबन लांडगे, डॉ. संदीप पाटील, सीमा पाटील, अरुण कांबळे, विजय तडेकर, नगरसेविका रूपाराणी निकम, संभाजी जगदाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
वसंतराव मुळीक म्हणाले, शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवशक, भाषा शुद्धिकरण, शिवमुद्रा असे निर्णय घेत खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य स्थापन केले. शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने ‘शिवाजी’ नावाचा महिमा जगभर पोहोचविण्यासाठी छायाचित्र प्रदर्शन, व्याख्यान, प्रबोधनात्मक कार्यक्रम, युवकांचा सहभाग असे उपक्रम हाती घेऊया. शिवराज्याभिषेक दिनाची
६ जूनला निघणारी मिरवणूक ही डॉल्बीमुक्त व विधायकतेचा संदेश देणारी असेल.
इंद्रजित सावंत म्हणाले, परकीयांच्या जोखडात अडकलेल्या भारताचा पहिला स्वातंत्र्य सोहळा म्हणून शिवराज्याभिषेक दिनाचे विशेष महत्त्व आहे. हा दिवस जगभरात पोहोचवून त्याचा लोकोत्सव करण्यासाठी कोल्हापूरकरांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
रूपाराणी निकम म्हणाल्या, शिवाजी महाराजांचे कार्य डोक्यावर घेऊन नव्हे तर डोक्यात घेऊन मराठा महासंघाचे कार्य सुरू आहे. यावेळी बबन लांडगे, शिरीष देशपांडे,
डॉ. संदीप पाटील यांचीही भाषणे झाली. मुस्लिम पंचायतचे अध्यक्ष फारूख कुरेशी यांनी या सोहळ््यात मुस्लिम समाजाचा सहभाग असेल, असे सांगितले.
सोमनाथ घोडेराव, मोहन जाधव, रमेश आपटे, विजय तडेकर, विजयसिंह पाटील, अरुण कांबळे, सीमा पाटील, शैलजा भोसले, सतीश कोळसे-पाटील, आनंद म्हाळुंगेकर, यांनी मनोगत व्यक्त केले.
सुवर्णसिंहासनासाठी योगदान
इंद्रजित सावंत म्हणाले, राज्य शासनाने गेल्यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडाच्या संवर्धनासाठी पाचशे कोटींचा निधी जाहीर केला. मात्र, त्यातला एक रुपयाचा निधीही दिलेला नाही. पूर्वी येथे शिवाजी महाराजांचे ३२ मण सोन्याचे सिंहासन होते, असे सिंहासन पुन्हा स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रातील एका संघटनेचे पुढाकार घेतला आहे. यानिमित्ताने रायगडचे जतन संवर्धन होणार असेल तर सुवर्ण सिंहासनासाठी कोल्हापूरकरांनी योगदान द्यावे.