सर्व जिल्ह्यांतील विकासकामे बंद करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2017 12:49 AM2017-04-28T00:49:14+5:302017-04-28T00:49:14+5:30
शासकीय ठेकेदारांचा इशारा : राज्यस्तरीय बैठकीत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाची घोषणा
कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभागाकडील ठेकेदारांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय घेऊन शासनाने रस्ते आणि बांधकाम प्रकल्पांमध्ये बड्या कंपन्यांसाठी लाल गालिचा अंथरण्याचा घाट घातला आहे. यामुळे राज्यातील पाच लाखांहून अधिक ठेकेदार बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे हा निर्णय न रद्द झाल्यास लवकरच सर्व जिल्ह्णांतील विकासकामे बंद करण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा शासकीय ठेकेदार संघाचे अध्यक्ष एन. डी. लाड व महाराष्ट्र राज्य सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.
राजर्षी शाहू स्मारक भवन येथे राज्यातील २० जिल्ह्णांतील ठेकेदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी झालेल्या निर्णयांची व चर्चेची माहिती बैठकीनंतर कोल्हापूर प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
लाड म्हणाले, बैठकीत राज्यातील छोट्या-मोठ्या ठेकेदारांचा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ स्थापन केल्याची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर १२ एप्रिल २०१७ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारांचा परवाना रद्द करण्याचा घेतलेला शासन निर्णय रद्द करावा, या शासन निर्णयाची सर्व जिल्ह्णांत होळी करावी. सर्व जिल्ह्णांतील विकासकामे बंद करावीत. राज्य व राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचे तीव्र आंदोलन हाती घ्यावे, असे निर्णय घेण्यात आले. या निर्णयाचे निवेदन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना देण्याचेही या बैठकीत ठरले. त्यानुसार मंत्री पाटील यांना लवकरच हे निवेदन देण्यात येणार आहे.
मिलिंद भोसले म्हणाले, पारदर्शकतेसाठी ठेकेदारांवर गंडांतर आणणाऱ्या राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम मंत्रीही अभियंताच करावा; कारण त्याशिवाय पारदर्शक कारभार होणार नाही.
दरम्यान, झालेल्या बैठकीत सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे अध्यक्ष दिलीप मेदगे म्हणाले, शासनाच्या या निर्णयामुळे लहान व मध्यम ठेकेदार उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे सर्वांनी संघटित होऊन याबाबत एल्गार पुकारावा.
अर्थ मूव्हिंग असोसिएशनचे अध्यक्ष आर. आर. पाटील म्हणाले, ठेकेदारांनी यंत्रसामग्रीसाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते थकले आहेत. आता सहनशीलतेचा अंत झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाने संघर्षाची तयारी ठेवावी.
नंदूरबारचे शंकरराव मोरे, जिल्हा परिषद कॉँट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष एम. जी. पाटील, सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे अध्यक्ष सुनील जाधव, कोल्हापूर जिल्हा शासकीय ठेकेदार संघाचे अध्यक्ष एन. डी. लाड, खजानिस सुनील नागराळे, सुरेश घुले, आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शिवाजी काशीद, संजय पाटील, कांतिलाल डुबल, नरेंद्र भोसले, कैलास लांडे, आदी उपस्थित होते.
कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे गुरुवारी राज्यभरातील शासकीय ठेकेदारांच्या बैठकीत सुनील नागराळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी दिलीप मेदगे, मिलिंद भोसले, एन. डी. लाड, सुनील जाधव, बी. एस. पाटील, आदी उपस्थित होते.