मजुरीवाढीसाठी वाढत्या महागाईचा विचार व्हावा
By admin | Published: March 30, 2016 12:33 AM2016-03-30T00:33:52+5:302016-03-30T00:43:01+5:30
खर्चीवाले यंत्रमागधारकांची मागणी : प्रांताधिकारी कार्यालयात यंत्रमागधारक संघटनेची बैठक
इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांच्या मजुरीमध्ये दरवर्षी होणाऱ्या वाढीबरोबरच खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीमध्ये वाढ करण्यात यावी. खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीमध्ये वाढ करताना कामगारांची मजुरीवाढ आणि वीज दरवाढीबरोबरच वाढत्या महागाईचाही विचार करण्यात यावा. तसेच व्यावसायिक मंदीच्या वेळी कापड व्यापाऱ्यांकडून कमी करण्यात येणारी खर्चीवाले यंत्रमागधारकांची मजुरी पूर्वीप्रमाणेच कायम ठेवावी, अशी मागणी येथील प्रांताधिकारी कार्यालयातील यंत्रमागधारक संघटनेच्या बैठकीत करण्यात आली.
खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीमध्ये जानेवारी २०१३ पासून मजुरीवाढ करण्यात यावी, अशी मागणी शहरातील इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे. खर्चीवाले यंत्रमागधारकांना ५२ पिकाच्या कापडास प्रतिमीटर दोन रुपये ८६ पैसे मजुरी मिळत असून, सध्याच्या महागाईचा विचार करता ती चार रुपये ६८ पैसे मिळावी, अशी मागणी यंत्रमागधारक संघटनेने केली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांमध्ये यंत्रमागधारक संघटना व कापड व्यापारी संघटना यांच्या प्रतिनिधींच्या चार बैठका झाल्या. मात्र, या चारही बैठकांमध्ये कोणताही निर्णय झालेला नाही.
अशा पार्श्वभूमीवर मंगळवारी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी शहरातील पाचही यंत्रमागधारक संघटनांची बैठक आयोजित केली होती. बैठकीमध्ये इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनबरोबर यंत्रमागधारक जागृती संघटना, जिल्हा पॉवरलूम असोसिएशन, राष्ट्रवादी पॉवरलूम असोसिएशन व पॉपलीन क्लॉथ पॉवरलूम असोसिएशन यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी विनय महाजन, सतीश कोष्टी, नारायण दुरूगडे, सचिन हुक्किरे, दीपक राशीनकर, विश्वनाथ मेटे, आदींनी आपले विचार मांडले.
बहुतांशी यंत्रमागधारकांच्या प्रतिनिधींनी दरवर्षी जानेवारी महिन्यात यंत्रमाग कामगारांना होणाऱ्या मजुरीवाढीच्या प्रमाणात तीनपट ते चारपट प्रमाणात खर्चीवाले यंत्रमागधारकांना मजुरीवाढ मिळावी, अशी मागणी केली.
गेल्या तीन वर्षांमध्ये यंत्रमाग कामगारांना १८ पैसे मजुरीवाढ देण्यात आली असून, खर्चीवाले यंत्रमागधारकांना ५४ ते ७२ पैसे मजुरीवाढ मिळावी, असाही आग्रह या बैठकीत धरण्यात आला.
अखेर प्रांताधिकारी जिरंगे यांनी खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीबाबत लवकरच संयुक्त बैठक आयोजित करून हा प्रश्न सोडविण्यात येईल, असे आश्वासन दिले आणि ही बैठक संपुष्टात आली. (प्रतिनिधी)
व्यापाऱ्यांकडून आर्थिक पिळवणूक
वस्त्रोद्योगात होणाऱ्या मंदीबरोबर यंत्रमाग कामगारांच्या मजुरीमध्ये कोणत्याही प्रकारची कपात केली जात नाही. मात्र, वस्त्रोद्योगात आर्थिक मंदी आली असता मंदीच्या गोंडस नावाखाली कापड व्यापाऱ्यांकडून खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात केली जाते, ज्यामुळे खर्चीवाले यंत्रमागधारकांची आर्थिक पिळवणूक होते. याच काळात कामगारांचा पगार, वाढलेले वीज दर आणि वाढलेली महागाई याचा कोणताही विचार कापड व्यापारी करीत नाही. त्याचा परिणाम म्हणून खर्चीवाले यंत्रमागधारकांना नुकसान सोसावे लागते. म्हणून आर्थिक मंदीच्या काळात खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीमध्ये कसलीही कपात करू नये, अशी जोरदार मागणी यंत्रमागधारक जागृती संघटनेने या बैठकीत केली.