चला, सावली तयार करूया

By admin | Published: May 10, 2017 09:05 PM2017-05-10T21:05:37+5:302017-05-10T21:05:37+5:30

सामूहिक प्रयत्नांची गरज : नियोजन करून वृक्षलागवड करणे आवश्यक

Let's create a shadow | चला, सावली तयार करूया

चला, सावली तयार करूया

Next


यंदा कोल्हापुरात फारच उन्हाळा जाणवायला लागला आहे. मराठवाडा, विदर्भामध्ये डोक्याला, तोंडाला रुमाल बांधून फिरणारे नागरिक आपण टी.व्ही.वरून पाहत होतो. मात्र, तशी माणसं आता कोल्हापुरात सर्रास दिसायला सुरुवात झाली आहे. महिला आणि मुली तोंडभर रुमाल बांधून जातात; म्हणून त्यांची चेष्टाही व्हायची; परंतु या उन्हानं अशी पाळी आणली की, पुरुषसुद्धा डोक्यावर टोपी घालून, तोंडाला रुमाल बांधून बाहेर पडायला लागले.
महाराष्ट्र शासनानं तीन वर्षांत ५० कोटी झाडे लावण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. भूभागाच्या ३३ टक्के वनक्षेत्र हे आदर्श प्रमाण मानले जाते. कोल्हापूर जिल्ह्याच्या क्षेत्रफळाच्या केवळ २० टक्के झाडेझुडपे आहेत. त्यामुळे हे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. गेल्या वर्षी जिल्ह्याच्या उद्दिष्टापेक्षाही जास्त वृक्षारोपण कोल्हापूर जिल्ह्यात झालं. मात्र, महानगरपालिकेकडून या कामामध्ये फारशी आस्था दाखविली नाही, हा आतापर्यंतचा इतिहास आहे.
आयआरबी कंपनीने तोडलेली झाडे शेंडा पार्क चौकाच्या डाव्या बाजूला पर्यावरणवादी कार्यकर्त्यांच्या दबावाखातर पुन्हा लावण्यात आली; परंतु नंतरच्या देखभालीअभावी आता या ठिकाणी वाळलेल्या लाकडाचे सुळके उभे आहेत. आता तरी
किमान महापालिकेने उत्तम नियोजन करून वृक्षलागवड करणे आवश्यक आहे.
प्रचंड उन्हामुळे शहरातून फिरताना जिथे झाड आहे तिथे गाड्या पार्किंगसाठी गर्दी दिसू लागते. त्यामुळे अगदी गाड्या रस्त्यावर येतील अशा पद्धतीने झाडाखाली सावलीत गाड्या लावल्या जातात. उमा टॉकीजकडून दसरा चौकाकडे येताना लक्ष्मीपुरीतील चौकात मोठे झाड आहे. त्याची सावलीही प्रचंड. त्यामुळे या ठिकाणी सिग्नलला चार मिनिटांऐवजी दहा मिनिटे जरी थांबायला लागले तरी कुणाची हरकत नसणार; कारण वर सावली आहे. मात्र तेच उमा टॉकीजच्या चौकात एकही झाड नसल्याने तेथे उन्हात थांबायचे नागरिकांच्या जिवावर येते. त्यामुळे दसरा चौकाकडून गोखले कॉलेजकडे जाणारे अनेक दुचाकीधारक उमा टॉकीजच्या चौकाच्या अलीकडे एक झाड आहे, त्याच्या सावलीला हिरवा सिग्नल होईपर्यंत थांबतात.
याच पद्धतीने आता जिथे गरज आहे तिथे सावली निर्माण करता येईल का, यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. यासाठी केवळ शोभेची झाडे न लावता जास्त सावली देणारी झाडे लावण्यावर भर दिला पाहिजे.
फार मुळे न पसरणारी झाडे असतील तर त्यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. वाहतुकीला अडथळा होणार नाहीत अशा पद्धतीने जर चौकाचौकांत, कोपऱ्याकोपऱ्यांवर शहरभर झाडे लावली गेली आणि ती चांगली जोपासली गेली तर सर्वत्र गारवा निर्माण होईल.
पक्ष्यांना चांगला आसरा मिळेल. झाड कधीही पडू शकतं, रोज पाने पडणार, त्याचा कचरा होणार असे
न म्हणता आवश्यक तेथे
झाडे लावून सावली कशी वाढविता येईल, यासाठी प्रयत्न हवे आहेत.


समीर देशपांडे

Web Title: Let's create a shadow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.