स्त्री सन्मानाची मानवी साखळी करूया
By admin | Published: August 4, 2016 01:01 AM2016-08-04T01:01:09+5:302016-08-04T01:22:56+5:30
‘लोकमत’ची साद : नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
कोल्हापूर : भारतीय संस्कृतीत एकीकडे स्त्रीची शक्ती म्हणून पूजा होते, तर दुसरीकडे तिच्यावर होत असलेल्या अत्याचारांचा आलेख वाढत जातोय. या दोन्ही भूमिकांऐवजी एक व्यक्ती म्हणून तिच्या अस्तित्वाचा आणि स्त्रीत्वाचा सन्मान व्हायला पाहिजे, या उद्देशाने ‘लोकमत’तर्फे आयोजित मानवी साखळीत संवेदनशील कोल्हापूरकर म्हणून मोठ्या संख्येने सहभागी होऊ या.
राज्यभर आणि देशाच्या विविध भागांतही महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर समाजमनांत स्त्रीत्वाचा सन्मान वाढावा, या भावनेने ‘लोकमत’तर्फे शनिवारी (दि. ६) म्हणजेच मैत्रीदिनाच्या निमित्ताने ‘धागा जोडू मैत्रीचा... सन्मान करू स्त्रीत्वाचा...’ ही संकल्पना घेऊन भवानी मंडपात मानवी साखळी करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता होणाऱ्या या उपक्रमात विविध संस्थांसह शाळा, महाविद्यालये, सखी मंच सदस्या यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महिलांवरील अत्याचाराच्या घटनात दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ कायदे करून किंवा संबंधित आरोपींना शिक्षा करून अशा घटनांना आळा बसणार नाही; तर स्त्रीबद्दल आदरभाव निर्माण व्हायला हवा. त्यासाठी मुलांमध्ये आणि पुरुषांमध्ये जाणीवजागृती व्हायला हवी. समाजबदलाच्या आणि परिवर्तनाच्या चळवळीत ‘लोकमत’ने नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून या मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे. ही साखळी केवळ महिलांची किंवा पुरुषांची नव्हे तर मानवतेची आहे. म्हणूनच त्यात स्त्री, पुरुष, विद्यार्थी, विद्यार्थिनी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊ शकतात. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवीत प्रबोधनाच्या दिशेने आपले पाऊल टाकावे आणि या कार्यास पाठिंबा द्यावा, असे आवाहन विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी केले आहे.
पूर्वीच्या काळी शिवाजी महाराजांनी महिलेवर अत्याचार केलेल्या देशमुखाचे हात-पाय तोडले होते, शाहू महाराजांनीही महिलांसाठी विशेष कायदे केले होते. आता मात्र छेडछाड झाली की मुलींना जबाबदार धरले जाते. त्यांनाच घाबरून राहण्याचा सल्ला दिला जातो. महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी घरातूनच मुलांवर संस्कार केले पाहिजे. पण मुलांना मोकळीक मिळते. महिलांवरील अत्याचार थांबण्यासाठी मुलांवर बालपणापासून सन्मानाचे संस्कार रूजवले पाहिजे. -मधुरिमाराजे छत्रपती
महिलांचा सन्मान करण्यासाठी आधी मुलांमध्ये त्याबद्दलची भावनी रुजवली पाहिजे. सुजाण पालकत्वातूनच अशा घटनांना आळा बसेल. त्यामुळे ‘लोकमत’ने उचललेले हे प्रबोधनाचे पाऊल अत्यंत कौतुकास्पद आणि आदर्शवत आहे. त्यातून नागरिकांपर्यंत चांगला संदेश पोहोचेल. - सीमा पाटील, सामाजिक कार्यकर्त्या
पुरुषांनी महिलांचे संरक्षण करायचे, अशी आपली संस्कृती आहे; पण आज पुरुषांकडूनच महिलांना धोका वाढत आहे. हे थांबवायचे असेल तर जनजागृती झाली पाहिजे. त्यासाठी ‘लोकमत’ने घेतलेला पुढाकार हे महत्त्वाचे पाऊल आहे.
- संध्या कुंभारे, उद्योजिका
स्लोगन स्पर्धा...
या फेरीच्या निमित्ताने स्लोगन (घोषवाक्य) स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. त्यातील उत्कृष्ट तीन स्पर्धकांना बक्षिसे देण्यात येतील. मानवी साखळीवेळी या विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात येणार आहे. इच्छुकांनी आपले स्लोगन मोबाईल क्रमांक ९८८१८६७६०० या व्हॉट्स अॅपवर पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.