रुजू व्हायचे अन् बदली करून जायचे..
By admin | Published: December 29, 2014 09:50 PM2014-12-29T21:50:46+5:302014-12-29T23:40:22+5:30
जिल्हा परिषद : परजिल्ह्यातील उमेदवारांची अनोखी शक्कल; जिल्ह्यात रिक्त जागांचा डोंगर
रहिम दलाल - रत्नागिरी -जिल्हा परिषद परजिल्ह्यातील डी. एड. धारकांसाठी नोकरी मिळविण्याची कार्यशाळा बनली आहे. परजिल्ह्यातील उमेदवार शिक्षणसेवक म्हणून रुजू झाल्यानंतर केवळ शिक्षक होण्याची असणारा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण करतात आणि त्यानंतर जिल्हा बदली करून आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जात असल्याने रत्नागिरी जिल्हा परिषद रिक्त पदांची जंत्री तशीच राहत आहे.चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ११२ शिक्षक जिल्हा बदलीने अन्य जिल्ह्यात गेले असून, आणखी २८ शिक्षक जिल्हा बदलीच्या तयारीत आहेत.
जिल्हा परिषदेकडून होणारी शिक्षणसेवक भरती नेहमीच वादाची ठरली आहे. शिक्षणसेवक भरतीच्या वेळी स्थानिकांना प्राधान्य द्यावे, यासाठी सुरुवातीला शिवसेनेने आंदोलने केली. त्यानंतर मागील शिक्षणसेवक भरतीमध्ये स्थानिकांसाठी मनसेने आंदोलन उभारले होते. शिवसेना व मनसेने केलेल्या आंदोलनामुळे परजिल्ह्यातील अनेक उमेदवार परीक्षेला आलेले नाहीत. डी. एड.धारक स्थानिकानीही जेलभरो आंदोलन केले होते. मात्र, त्यानंतर परजिल्ह्यातीलच उमेदवारांची शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे स्थानिकांमध्ये अजूनही असंतोष धुमसत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचानीही नियुक्त्या करण्यात आलेलेल्या शिक्षणसेवकांना शाळेत प्रवेश देणार नसल्याची भूमिका घेतली होती.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या २७४८ प्राथमिक शाळा आहे़ त्यात मराठी माध्यमाच्या २५७४, तर उर्दू माध्यमाच्या १७४ शाळांचा समावेश आहे़ यामध्ये १ लाख ७ हजार ६३८ विद्यार्थी अध्यापनाचे धडे घेत असून, सुमारे ९००० शिक्षक आहेत़ जिल्हा परिषदेच्या ११३९ प्राथमिक शाळांची स्थिती फार बिकट असून, त्या कधीही बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ मराठी माध्यमाच्या १ ते १० पटसंख्या असलेल्या शाळा ४६६, तर ११ ते २० पटसंख्या असलेल्या ६७३ शाळा आहेत़ १४ प्राथमिक शाळा शून्य शिक्षकी असल्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागालाही अन्य शाळांमधील शिक्षकांची हलवाहलव करावी लागत आहे़
प्रत्येक शिक्षणसेवक भरतीमध्ये ९५ टक्के परजिल्ह्यातील उमेदवारांचा भरणा करण्यात येतो, हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे स्थानिकांवर अन्याय होत असल्याची ओरड डी. एड.धारकांकडून करण्यात येते. अजूनही स्थानिक बेरोजगार डी. एड.धारकांचा शिक्षणसेवक नियुक्तीसाठी लढा सुरु आहे. शिक्षणसेवक नियुक्त झाल्यावर तीन वर्षाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर दरवर्षी शेकडो शिक्षक जिल्हा बदली करुन निघून जातात. त्यामुळे येथील शिक्षकांच्या जागा रिक्त होऊन शिक्षणसेवक भरतीला पुन्हा जोर येऊन परजिल्ह्यातील उमेदवारांना त्यामध्ये संधी मिळते. मे, २०१४ पासून डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषदेचे ११२ शिक्षक जिल्हा बदली करुन निघून गेले. सांगली, अहमदनगर, नाशिक, बीड या जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांमध्ये त्यांनी बदली करुन घेतल्या. त्यानंतर आता आणखी २८ शिक्षकांचे जिल्हा बदलीसाठी प्रस्ताव आहेत. त्यामुळे दरवर्षी जिल्हा बदलीने शेकडो शिक्षक जात असल्याने रत्नागिरी परिषद इतर जिल्ह्यांतील बेरोजगारांसाठी नोकरी मिळविण्याची कार्यशाळा बदली आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात शिक्षकांची सुमारे १०० पदे रिक्त आहेत.
१४ शाळा शून्यशिक्षकी
रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाचा विचार न करता केवळ स्वहित साधण्यासाठी गावाकडे जिल्हा बदलीने निघून जातात. त्यामुळे आजही जिल्ह्यातील १४ शाळा शून्य शिक्षकी आहेत. हा परिणाम जिल्हा बदलीने गेलेल्या शिक्षकांमुळेच झाला आहे. शासन एकीकडे शैक्षणिक दर्जा सुधारणासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. मात्र, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा विचार न करता आयुक्त कार्यालयाकडून जिल्हा बदलीसाठी लाखोंची देवाणघेवाण करण्यात येते.
सर्वाधिक नुकसान विद्यार्थ्यांचे...
जिल्हा बदलीने गेलेल्या शिक्षकांमुळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची शेकडो पदे दरवर्षी रिक्त होतात. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे पालकांमध्येही तीव्र नाराजी पसरली आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान करुन जिल्हा बदल्या.
११२ शिक्षकांची अन्य जिल्ह्यात बदली.
जिल्ह्यात शिक्षकांची शेकडो पदे रिक्त.
आजही १४ प्राथमिक शाळा शून्य शिक्षकी.
स्थानिक डी. एड. बेरोजगारांमध्ये नाराजी.