‘चला होऊया जंतमुक्त’
By admin | Published: February 11, 2015 11:45 PM2015-02-11T23:45:02+5:302015-02-12T00:28:45+5:30
जंतनाशक दिन : आरोग्य विभागाचा उपक्रम, शाळांमध्ये मोफत औषधे
म्हालसवडे : राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेनिमित्त अंगणवाडी, तसेच सर्व शाळांमध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जंत उच्चाटन कार्यक्रम सुरू करण्यात आला. १९ वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना जंतनाशकासाठी ‘एल्बेंडेझॉल’ हे औषध मोफत देण्यात येत आहे. शुक्रवार (दि. १३) पर्यंत ‘राष्ट्रीय जंतनाशक दिना’निमित्त हे औषध दिले जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात १ ते १४ वयोगटांतील किमान २४१ दशलक्ष बालकांमध्ये जंतदोष आढळला. त्यामुळे अंगणवाडी व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शासनाच्यावतीने आरोग्य विभागामार्फत जंतनाशक औषध देण्याचा सुरक्षित मार्ग आहे. या औषधाचे दुष्परिणाम कमी आहेत. आरोग्य केंद्रामध्ये या प्रकारच्या औषधोपचारांच्या दुष्परिणामांचे पुरेशे उपचार त्वरित करण्याच्या सोयी उपलब्ध आहेत. नुकत्याच केलेल्या संशोधनाद्वारे जंतनाशक औषधोपचारांमुळे शाळेतील गैरहजेरीचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी झाले आहे.जंतनाशक गोळीच्या वाटपाची नोंद शाळेतील हजेरीपटात करण्यात येणार असल्याने गैरहजर विद्यार्थ्यांनाही हे औषध दिले जाणार आहे. याकरिता आशा स्वयंसेविका, अंगणवाडी, शाळा व आरोग्य विभाग कार्यरत असल्याने करवीर तालुक्यासहित संपूर्ण जिल्ह्यात या उपक्रमाला प्रतिसाद मिळत आहे.
औषधाने बालकांचा शारीरिक, बौद्धिक विकास
हा आतड्याचा कृमी दोष अस्वच्छतेतून व मातीतून संसर्ग होतो. उघड्यावर शौचाला बसण्यामुळे या आजाराचे प्रमाण वाढते. जंताच्या तीव्र संसर्गामुळे अतिसार, पोटदुखी, अशक्तपणा व मंदावलेली भूक, अशी लक्षणे आढळतात. बालकांचा शारीरिक व बौद्धिक विकास खुंटतो. कुपोषण व रक्ताशय होतो व नेहमी थकवा येतो. जंतनाशकासाठी ‘एल्बेंडेझॉल’ हे औषध घेतल्याने रक्ताक्षय कमी होऊन आरोग्य सुधारते. बालकांची वाढ होऊन ती निरोगी बनतात. त्यांच्यात अन्य संसर्गाना प्रतिकार करण्याची क्षमता वाढते.
जंतनाशक गोळी : एल्बेंडझॉल ४००
डोस : १ ते २ वर्षे अर्धी गोळी २०० मि. ग्रॅ.
२ ते १९ वर्षे : पूर्ण गोळी ४०० मि. ग्रॅ.
बालक व पालकांमध्ये सामाजिक जागरूकता.
शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीचे सहकार्य
आजारी विद्यार्थ्यांना औषध नंतर देण्यात येणार, आपत्कालीन मदतीची सुविधा
आशा स्वयंसेविका, अंगणवाडी, शाळा व आरोग्य विभाग करवीर
१३ फेब्रुवारीपर्यंत उपक्रम सुरू, शाळाबाह्य मुला-मुलींनाही औषधे देण्यात येणार