चला सवय लावूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:12 AM2017-08-15T00:12:22+5:302017-08-15T00:12:22+5:30

Let's get used to it | चला सवय लावूया

चला सवय लावूया

Next




कोल्हापूर महानगरपालिकेत कामानिमित्ताने दररोज जाणं-येणं होत असतं. पंचवीसहून अधिक वर्षे झाली असतील. महापालिका कार्यालयात जाणं अगदी अपवादानंच चुकलं असेल. अनेक नगरसेवक निवडून आले, त्यांचा कार्यकाल संपला की यायचे बंद झाले. काहींची दुसरी पिढी आता निवडून यायला सुरुवात झाली आहे. मी मात्र आजही महापालिकेत जातोच आहे. त्यामुळे अधिकाºयांची-कर्मचाºयांची मानसिकता, काम करण्याची वृत्ती, काम टाळण्याची प्रवृत्ती, नको तिथं अधिक लक्ष घालून कायद्याला ‘डॉज’ मारून ‘हिताचं’ काम करण्याची घिसाडघाई अशा अनेक वृत्ती, प्रवृत्ती पाहायला मिळाल्या. चांगले काम करणारे अनेक प्रामाणिक अधिकारी आहेत, परंतु त्यांची कोणी विशेष दखल घेतली नाही. कामात उत्साह दाखविला तरीही कायम बेदखलच. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांनी चाकोरीत काम करण्याची भूमिका बजावली. काही अधिकारी मात्र ‘वरिष्ठांची मर्जी’ सांभाळून, त्यांना खूश करण्याची एकही संधी सोडली नाही. आपल्यावरील कार्यभार जरी समाधानकारक सांभाळता आला नसला तरी दुसºयाच्या खात्यात लक्ष घालून वरिष्ठांची दिशाभूल करून खुर्ची सांभाळण्याचा प्रयत्न करणारेही पाहिलेत. दुर्दैवाने प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ कर्मचाºयांपेक्षा अशा ‘बोलबच्चन’ अधिकाºयांची चलती असल्याचे प्रत्येकवेळी पाहायला मिळाले. बाहेरून येणाºया अधिकाºयांना इथलं काही माहीत नसतं. त्यामुळे असे अधिकारीही ‘बोलबच्चनां’च्या जाळ्यात अलगद अडकतात. त्यांना चांगले काम करणारे अधिकारी कधी दिसलेच नाहीत. चांगल्याची बाजू खरी असली तरी त्यावर विश्वास ठेवायला कोणी तयार झालं नाही.
महापालिकेत सध्या चांगलं काम करणाºयांपैकी एक अधिकारी म्हणजे डॉ. विजय पाटील. आता या अधिकाºयालाही विरोधक आहेत. त्यांच्या कामाची अलोचना करणारे आहेत. मुळात डॉ. पाटील पशुवैद्यकीय अधिकारी असूनही आरोग्य विभागाचे मुख्य आरोग्य निरीक्षक म्हणून काम करतात. त्यांनी कचरा व्यवस्थापनाचे काम अगदी सक्षमपणे सांभाळले आहे. खरंतर कचरा उठाव आणि त्याची विल्हेवाट हे काम डोकंदुखी आहे. ‘बारा महिने, चोवीस तास’ चालणारं, टीकेचं लक्ष बनविणारे हे काम आहे. कितीही चांगलं काम केलं आणि एखाद्या दिवशी गैरसोय झाली की लगेच टीकेची झोड उठलीच म्हणून समजा! डॉक्टरांनी कार्यभार स्वीकारल्यापासून कामाचा धडाका लावला आहे. यापूर्वी कचरा उठावाचं काम खासगी यंत्रणेमार्फत होत असे; पण आता तेच महानगरपालिकेच्या यंत्रणेतून आणि नियंत्रणातून चोखपणे बजावत आहेत. रस्त्यांवर कचरा कोंडाळ्यांचे प्रमाण आता कमी झाले असून, रस्त्यावर इतरत्र कचरा साचून राहण्याचं प्रमाणही कमी होत आहे. रोज सकाळी घंटागाडी दारात येते, कचरा उठाव होतो. त्यामुळेच हे शक्य झाले. आता डॉक्टरांनी एक नवीन उपक्रम राबविण्यास सुरुवात केली असून, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळतोय. शिवाजी विद्यापीठाच्या राष्टÑीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ऐतिहासिक वास्तू, परिसर स्वच्छ करण्याची त्यांची कल्पना आहे. गेल्या आठवड्यात विद्यापीठातील विद्यार्थ्यांना घेऊन रंकाळा परिसराची स्वच्छता करण्यात आली. यापुढे प्रत्येक महाविद्यालयातील प्राचार्यांशी, तसेच धार्मिक संस्थांशी संपर्क साधून असे उपक्रम राबविण्याचा त्यांचा विचार आहे. शहराची स्वच्छता कशी राखावी, एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य कसे पार पाडावे याबाबत विद्यार्थ्यांना, तरुणपिढीला कोणी आजवर शिकवलंच नाही. कारण हा विषय अभ्यासक्रमात नाही; परंतु त्याची जाणीव विद्यार्थीदशेत करून देणेही तितकंच महत्त्वाचं आहे. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तशी सवय लावणे गरजेचं आहे. सकाळी उठल्यावर आपण न चुकता आपले दात ब्रशने स्वच्छ करतो. त्याशिवाय चैन पडत नाही. दात घासण्याची सवय आपणाला लहान वयात लावली गेली म्हणून आज आपण न चुकता दात घासत असतो. सवयीचा तो एक भाग बनला. तद्वतच विद्यार्थ्यांना सार्वजनिक स्वच्छतेबाबतीत सवय लावली पाहिजे. अशा मोहिमा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबतीत जागृती निर्माण झाली, तर भविष्यात स्वच्छतेचं महत्त्व ओळखणारे नागरीक घडले तर आपले शहर नक्की स्वच्छ राहू शकेल. महापालिका यंत्रणेवरील ताण कमी होईल, अशी त्यांची धारणा आहे.
- भारत चव्हाण

Web Title: Let's get used to it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.