शिरोलीला हद्दवाढीतून वगळू
By admin | Published: June 17, 2014 01:37 AM2014-06-17T01:37:07+5:302014-06-17T01:45:05+5:30
हर्षवर्धन पाटील : ‘क’ वर्ग नगरपालिका मंजूर करण्याची ग्वाही
शिरोली : शिरोलीला हद्दवाढीत जायचे नसेल तर हद्दवाढीतून शिरोलीचे नाव निश्चित वगळू व ‘क’ वर्ग नगरपालिकेसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बैठक घेऊन नगरपालिका मंजूर करू, असे आश्वासन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार महादेवराव महाडिक यांना दिले. आमदार महाडिक शिरोली ग्रामपंचायतीचे शिष्टमंडळ घेऊन कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्र्यांना भेटले. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटीलही उपस्थित होते.
यावेळी आमदार महाडिक व पालकमंत्री पाटील यांच्यात हद्दवाढीबाबत चर्चा झाली. यावेळी महाडिक म्हणाले, शिरोली गावचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सध्या शिरोलीतील सर्व रस्ते चकाचक आहेत. गावाला मुबलक पाणी मिळावे म्हणून राष्ट्रीय पेयजल योजना राबविली आहे, तर दुसरीकडे महानगरपालिका शेजारच्या उपनगरांनाही सुविधा देऊ शकत नाही. मग आम्हाला काय सुविधा देणार? शिरोली गाव हे वडगाव मतदारसंघातील सर्वांत मोठे गाव आहे. या गावावर वडगाव मतदारसंघाच्या आमदाराचे भवितव्य ठरते. त्यामुळे हे गाव महानगरपालिकेत जाऊन
चालणार नाही.
कदमवाडी, भोसलेवाडी, कसबा बावडा, जाधववाडी यांना महानगरपालिकेत घेतले आहे. या उपनगरांचा अद्याप विकास झालेला नाही. तसेच शिरोली गाव हद्दवाढीत गेले तर शेजारील असणाऱ्या एम.आय.डी.सी.लाही त्याचा मोठा त्रास होणार आहे. उद्योगांना एल.बी.टी.ही लागणार आहे. त्यामुळे हे उद्योग परराज्यांत जातील. म्हणून आम्हाला हद्दवाढ नको आहे. आम्हाला पेठवडगावप्रमाणे ‘क’ वर्ग नगरपालिका मंजूर करून द्या, अशी मागणी शिष्टमंडळाच्यावतीने महाडिक यांनी पालकमंत्री पाटील यांच्याकडे केली.
यावर मंत्री पाटील म्हणाले, एवढ्या अडचणी शिरोली गावाला व ग्रामस्थांना येत असतील तर निश्चितच शिरोली गाव हद्दवाढीतून वगळू. मुख्यमंत्री चव्हाण यांच्याबरोबर मुंबईत ताबडतोब बैठक घेऊन हा निर्णय घेऊ. तसेच या बैठकीला नगरविकास मंत्र्यांना बोलावून ‘क’ वर्ग नगरपालिका मंजूर करू, असे आश्वासनही आमदार महाडिक व शिरोली ग्रामपंचायत आणि शिष्टमंडळाला दिले.
यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, शिरोली ग्रामपंचायतीचे सलीम महात, अनिल खवरे, सुरेश यादव, डॉ. सुभाष पाटील, विजय जाधव, शिवाजी खवरे, लियाकत गोलंदाज, विजय चव्हाण, गोविंद घाटगे, शिवाजी समुद्रे, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)