महापालिकेच्या इमारतीवरून उड्या मारून जीव देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:22 AM2021-03-18T04:22:41+5:302021-03-18T04:22:41+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागात गेल्या काही वर्षांपासून झालेल्या घोटाळ्याची माहिती जनतेसमोर जाहीर न केल्यास कोल्हापूर शहर व जिल्हा ...
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागात गेल्या काही वर्षांपासून झालेल्या घोटाळ्याची माहिती जनतेसमोर जाहीर न केल्यास कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे कार्यकर्ते महापालिकेच्या इमारतीवरून उड्या मारून जीव देतील, असा इशारा कृती समितीने बुधवारी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला.
कृती समितीच्या शिष्टमंडळाने दुपारी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सहायक आयुक्त विनायक औंधकर यांची भेट घेऊन घरफाळा विभागातील घोटाळ्यासंबंधी जाब विचारला. घरफाळा घोटाळ्याची किती प्रकरणे आहेत, त्याची चौकशी झाली आहे का, चौकशी झाली असेल, तर दोषींवर काय कारवाई केली, घोटाळ्यातील रक्कम वसुलीसाठी काय कार्यवाही केली, कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम कोण करीत आहे, अशा प्रश्नांची सरबत्ती करून दोन्ही अधिकाऱ्यांना भंडावून सोडले.
पालिकेतील दरोडेखोरांना अभय न देता थेट कारवाई करा, ज्यांनी घरफाळा चुकविला आहे, त्यांच्याकडून तो तात्काळ वसूल करा, अशी मागणी अशोक पोवार यांनी केली. चार दिवस आधी पूर्वकल्पना देऊनही प्रशासक बलकवडे भेटत नाहीत, याची आता आम्हालाच लाज वाटायला लागली आहे, अशा शब्दांत पोवार यांनी नाराजी व्यक्त केली.
ज्यांनी घोटाळे केले, त्यांच्या मिळकती जप्त केल्या का, मिळकतीवर बोजा चढविला का, त्यांच्याकडून वसुली केली का, अशी विचारणा रमेश मोरे यांनी केली. घोटाळा तरी झाला आहे का, हे तरी स्पष्ट करा, अशी मागणीही त्यांनी केली.
-चौकशी अहवाल प्रशासकांना सादर
गेल्या वर्षभरात घरफाळा घोटाळ्याची जी प्रकरणे समोर आली, त्याची चौकशी पूर्ण झाली आहे. चौकशी एकदा नाही, तर तीन वेळा झाली. त्याचा अहवाल प्रशासक बलकवडे यांच्याकडे शुक्रवारीच सादर करण्यात आला आहे. जे- जे कर्मचारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल. शिवाय ज्यांनी घरफाळा चुकविला आहे, त्यांच्याकडून तो वसूलही करता येऊ शकतो, असे सहायक आयुक्त विनायक औंधकर यांनी सांगितले.