चला... ‘काजवा’ भ्रमंतीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 11:11 PM2019-05-06T23:11:50+5:302019-05-06T23:17:11+5:30
राधानगरी नेचर क्लब आणि परिस्थितीकी विकास समिती राजापूरतर्फे यावर्षी काजवा भ्रमंतीचे आयोजन करण्यात येत आहे. ही भ्रमंती ११ ते २६ मे या कालावधीत होणार असून, निसर्गप्रेमींना अद्भुत नजारा राधानगरीत पाहावयास मिळणार आहे.
- संदेश म्हापसेकर
राधानगरी नेचर क्लब आणि परिस्थितीकी विकास समिती राजापूरतर्फे यावर्षी काजवा भ्रमंतीचे आयोजन करण्यात येत आहे. ही भ्रमंती ११ ते २६ मे या कालावधीत होणार असून, निसर्गप्रेमींना अद्भुत नजारा राधानगरीत पाहावयास मिळणार आहे.
राधानगरी असं उच्चारताच डोळ्यांसमोर ज्या ज्या गोष्टी उभ्या राहतात त्यामध्ये काजव्यांचा समावेश प्रामुख्याने होतो. भर उन्हाळ्यात पावसाच्या आगमनाची चाहूल लागली की, हा निसर्गाचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो. रात्री अंधाऱ्या ठिकाणाहून समोर नजर टाकल्यास हा काजव्यांचा नजारा पाहायला मिळतो. निसर्गाची मुक्त उधळण आणि आविष्कार पाहायचा असेल तर नक्कीच राधानगरी भ्रमंतीला यायला हवे. हा आपल्या आयुष्यातील आनंद देणारा काळ असेल.
हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजवे बसलेले असतात. लुकलुकत होणारी काजव्यांची प्रकाशफुले आपल्या डोळ्यांना सुखावून जातात. कुतूहलमिश्रित आणि विस्मयचकित मुद्रेने निसर्गवैभव आपण पाहतच राहतो आणि पाहता-पाहता भान हरपून जाते. कोल्हापूरपासून ५० किलोमीटरवर असणाºया राधानगरी आणि काळम्मावाडी तलावाच्या परिसरात एक समृद्ध जैवविविधता आढळते. खिंडी व्हरवडे घाटापासून निसर्गसौंदर्याने नटलेल्या परिसराची झलक दाखवितो. येथे भर उन्हात जाणवणारा नैसर्गिक हवेचा गारवा, सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेले वृक्षवल्ली आणि इथल्या समृद्ध जैवविविधतेचा सर्वच ऋतूत अनुभव घेण्यासाठी राधानगरीला पर्यटकांची गर्दी होत असते. अशा आडवाटेवरच्या ठिकाणावर सगळ्या प्रकारच्या सुविधा मिळणं शक्य नसतं, सुरक्षित व पर्यावरणपूरक पर्यटनासाठी राधानगरी नेचर क्लब अभयारण्य पर्यटनस्थळी अनेक सोयी उपलब्ध करून देत आहे.
पिवळ्या रंगाचे ठिपके कायमस्वरूपी आपल्या जीवनात आनंद साजरा करताना एक वर्तुळ तयार करते, हा निसर्गाचा आविष्कार म्हणजे काजवा भ्रमंती. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आजच्या काळातील महत्त्व ओळखून तो सर्वसामान्यांसाठीही खुला करण्याचे काम राधानगरी नेचर क्लबच्यावतीने केले आहे. अतिपर्यटन आणि त्याचा पर्यावरणाला होणारा धोका टाळण्यासाठी यावेळच्या काजवा भ्रमंतीसाठी पर्यटकांना मर्यादित प्रवेश दिले जाणार आहेत. यासाठी पर्यटकांनी आपल्या प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. या पर्यावरणपूरक पर्यटनाला म्हणजे काजवा भ्रमंती प्रत्येकांनी करावी.
शेवटी निसर्गात जाताना आपण निसर्गाचा एक जबाबदार घटक आहोत याची जाणीव ठेवून निसर्गाचे संतुलन बिघडणार नाही याची खबरदारी आपण प्रत्येकाने घ्यायला हवी.
(लेखक राधानगरी नेचर क्लबचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)