उद्योगांची ४० टक्के बांधकाम अट २० टक्के करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:30 AM2021-08-25T04:30:07+5:302021-08-25T04:30:07+5:30
कणेरी : ...
कणेरी : उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकार सकारात्मक असून, भूखंडावर ४० टक्के बांधकाम करण्याची अट शिथिल करून ती २० टक्के करू, असे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी औद्योगिक संघटनांच्या शिष्टमंडळाला दिले. महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाशी संबंधित विविध अडचणींसंदर्भात औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मुंबई येथे देसाई यांची भेट घेतली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा उपस्थित होते. संतोष मंडलेचा यांनी नाशिकला महिला क्लस्टरसाठी भूखंड मिळावा, परिपत्रकात स्पष्टता असावी अशा मागण्या केल्या. भूखंडावर ४० टक्के बांधकाम पूर्ण केले तर व्यवसायासाठीच भांडवलाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे उद्योगाप्रमाणे कमीत कमी २० टक्के बांधकाम करणे सक्तीचे ठेवून उर्वरित मोकळी जागा ठेवण्यास मंजुरी मिळावी, अशा मागण्या बैठकीत करण्यात आल्या. शिष्टमंडळात महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पाटील, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस, गोरख माळी, नितीन दलवाई, सागर नागरे उपस्थित होते.
फोटो
: २४ उद्योजक बैठक
महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाशी संबंधित विविध अडचणींसंदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या सोबत औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मुंबई येथे बैठक पार पडली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना निवेदन देण्यात आले.