सर्किट बेंचसाठी नव्याने ठराव करू

By Admin | Published: August 17, 2016 01:04 AM2016-08-17T01:04:35+5:302016-08-17T01:12:19+5:30

चंद्र्रकांतदादांची ग्वाही : मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेणार; बार असोसिएशनतर्फे सत्कार

Let's make a new resolution for the circuit bench | सर्किट बेंचसाठी नव्याने ठराव करू

सर्किट बेंचसाठी नव्याने ठराव करू

googlenewsNext

कोल्हापूर : उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे अशा आशयाचा व फक्त कोल्हापूरचाच उल्लेख असेलला ठराव पुन्हा एकदा नव्याने मंत्रिमंडळात करू व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत पुढील आठ-दहा दिवसांत या प्रश्नी संयुक्त बैठक घेऊ, असे आश्वासन मंगळवारी महसूलमंत्री व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे दिले. सर्किट बेंचसाठी शासन सकारात्मक असून, सरकारच्या बाजूने काही अडचण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने कसबा बावड्यातील न्यायसंकुलामध्ये चंद्रकांतदादा पाटील यांचा ‘भारतीय संविधाना’ची प्रत देऊन बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या समारंभास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र अवचट, जिल्हा सरकारी वकील दिलीप मंगसुळे, महेश जाधव, आदी मान्यवरांसह असोसिएशनचे पदाधिकारी आणि वकील बांधव उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, ‘कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे यासंबंधीचा मंत्रिमंडळाचा ठराव यापूर्र्वीच झाला आहे. त्यावेळी कोल्हापूरसमवेत पुण्यासही सर्किट बेंच करण्याचा उल्लेख त्या ठरावात आहे. त्यामुळे फक्त कोल्हापूरसाठी नव्याने ठराव करणे आवश्यक असल्यास तो नक्की करू. सर्किट बेंचसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आठ-दहा दिवसांत आयोजित केली जाईल.
खंडपीठाच्या पायाभूत सुविधांसाठी आवश्यकतेनुसार शासनस्तरावरून निधी उपलब्ध करून देण्याबाबतही प्रयत्न केले जातील. जिल्हा बार असोसिएशनच्या ग्रंथालयासाठी आवश्यक तो निधी तत्काळ उपलब्ध करून दिला जाईल. बार असोसिएशनमधील ग्रंथालय हे अत्याधुनिक व अधिक दर्जेदार पद्धतीचे झाले पाहिजे. ग्रंथालयात आवश्यक सर्व पुस्तकांची उपलब्धी, ई-लायब्ररी असे उपक्रम हाती घेण्याची सूचना पाटील यांनी केली.
बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. मोरे प्रास्ताविकात म्हणाले, ‘उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी कोल्हापूरला सर्किट बेंच का गरजेचे आहे, याचाही उल्लेख अहवालात केला आहे. त्यामुळे शासनाने त्यांच्या मताचा विचार केला पाहिजे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पायाभूत सुविधांसाठी ११०० कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे; पण अजून निधी मिळालेला नाही. तो त्वरित मिळावा.’
सचिव अ‍ॅड. सर्जेराव खोत यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष अ‍ॅड. अरुण पाटील यांनी आभार मानले. या समारंभास ज्येष्ठ वकील, इतर सभासद उपस्थित होते. (प्रतिनिधी)


विशेष सभा आज : उपोषण शुक्रवारी
कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने आज, बुधवारी दुपारी दोन वाजता विशेष सभा बोलाविली आहे. या सभेत शुक्रवारी होणाऱ्या लाक्षणिक उपोषणासंदर्भासह इतर विषयांवर चर्चा होणार असल्याचे अ‍ॅड. प्रकाश मोरे यांनी सांगितले. सहा जिल्ह्यांत शुक्रवारी (दि. १९) सर्किट बेंचसह प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
तीन महिन्यांतून कायदेविषयक चर्चासत्रे घ्या
नवीन वकिलांना तसेच माहिती व तंत्रज्ञानाच्या जगात कायदेविषयक विषयावरील अधिकाधिक ज्ञान मिळण्यासाठी दोन-तीन महिन्यांतून बार असोसिएशनने चर्चासत्रे आयोजित करावीत. त्यासाठी प्रमुख पाहुणे व अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

Web Title: Let's make a new resolution for the circuit bench

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.