सोयाबीन बियाणे टंचाई चार दिवसांत कमी करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:20 AM2021-05-30T04:20:51+5:302021-05-30T04:20:51+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील सोयाबीन बियाण्यांची टंचाई चार दिवसांत कमी करू, अशी ग्वाही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील सोयाबीन बियाण्यांची टंचाई चार दिवसांत कमी करू, अशी ग्वाही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिली. बियाणे टंचाईच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कृषी विभागात धाव घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.
माॅन्सून ताेंडावर आल्याने शेतकरी मशागती व पेरणीच्या कामात व्यस्त आहे. शिवार पेरणीसाठी तयार आहे, पण बियाणेच उपलब्ध होत नसल्याने शेतकरी सोयाबीन बियाण्यासाठी दारोदार भटकत आहे. मृगापर्यंत पेरणी झाली नाही तर सोयाबीनला उतारा चांगला मिळत नाही. पण सध्या सोयाबीनच्या बियाण्यांची प्रचंड टंचाई आहे. मागणीच्या तुलनेत १४ टक्के देखील पुरवठा झालेला नाही. या पार्श्वभूमीवर बियाणे व खतांची टंचाई व वाढीव दराकडे कृषी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधताना देवणे यांनी खरिपात शेतकऱ्यांची होणारी गैरसोय व लूट तातडीने थांबवावी अशी विनंती केली. युरिया खताची जाणीवपूर्वक टंचाई दाखवली जात असू्न बफर स्टॉकमधील खते वितरित करा, असे सुचवले. कृषी विभागाने ते त्वरित मान्य करत युरियाचा पुरवठा वाढवला जाईल असे सांगितले.
खतांची वाढीव किमतीने विक्री होत असल्याकडे लक्ष वेधत देवणे यांनी याला आळा घालण्यासाठी काय केले, अशी विचारणा केली. यावर कृषी अधिकाऱ्यांनी भरारी पथके स्थापन केली असून आजपासून दहा पथके कार्यरत होत होत असल्याचे स्पष्ट केले. तक्रारीसाठी कृषी विभागाने हेल्पलाईन सुरू केली असून त्याचा लाभ घ्यावा, असेही कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
फोटो: २९०५२०२१-कोल-शिवसेना
फोटो ओळ : कोल्हापुरात शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी शनिवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांसमोरील अडचणी दूर करण्याची मागणी केली .