‘माझं कोल्हापूर, निरोगी कोल्हापूर’ संकल्प करूया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:28 AM2021-08-17T04:28:33+5:302021-08-17T04:28:33+5:30
कोल्हापूर : गेले दीड वर्ष जिल्ह्यातील नागरिक कोरोनाशी लढा देत आहेत. या लढ्यात आपण काही प्रमाणात यशस्वी झालो. मात्र ...
कोल्हापूर : गेले दीड वर्ष जिल्ह्यातील नागरिक कोरोनाशी लढा देत आहेत. या लढ्यात आपण काही प्रमाणात यशस्वी झालो. मात्र यापुढे गाफील राहून चालणार नाही. नागरिकांनी ‘माझं कोल्हापूर, निरोगी कोल्हापूर’ हा संकल्प सिद्धीस न्यावा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उत्साही वातावरणात रविवारी सकाळी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा पार पडला. यावेळी छत्रपती शाहू, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर संवाद साधताना पाटील म्हणाले, जिल्ह्यात येणाऱ्या पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने आगामी काळात नदीकाठच्या गावाचं शंभर टक्के पुनर्वसन करण्यात येईल. यंदा ‘पब्लिक ॲड्रेस सिस्टीम’ सुरु केल्याने जीवित व पशूहानी टाळण्यात यश आले. त्यामुळे देशातील हा पहिला प्रयोग संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येईल. साडेतीन लाख लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले.
कोरोनाच्या लढाईत नागरिकांसह आरोग्य विभाग आणि प्रशासनाने केलेल्या कामाचे कौतुक करून पाटील म्हणाले, तिसऱ्या लाटेकडे नागरिकांनी दुर्लक्ष करु नये. स्वयंप्रेरणेने मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सुमारे ५९ हजार हेक्टर कृषी क्षेत्र बाधित झाले आहे. याचे पंचनामे काही दिवसांत पूर्ण होतील. पूरबाधितांना अनुदानासाठी आगाऊ मदत म्हणून शासनाकडून १७ कोटी ४२ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत २४ लाख लाभार्थ्यांना ३६ हजार मेट्रिक टन गहू व तांदळाचे वाटप करण्यात आले. १० हजारहून अधिक रिक्षा चालक-मालकांना दीड हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचा विकास ही माझी विकासाची संकल्पना असून, वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्लास्टिकमुक्तीला प्राधान्य द्यावे. यावेळी पाटील यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांची आस्थेने विचारपूस केली.
यानंतर शाहू सभागृहातील कार्यक्रमामध्ये स्वामित्व गावठाण योजनेंतर्गत येणाऱ्या मिळकतीपैकी हनमंत व दिनकर पराळ यांना प्रतिकात्मक स्वरुपात प्रत्येकी एक-एक मिळकत पत्रिका पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आली. संजय सोनार यांनी सूत्रसंचालन केले तर निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी आभार मानले.
चौकट
यांचा झाला सत्कार
स्केटिंग राष्ट्रीय खेळाडू समर्थ पांढरबळे, युवराज सूर्यवंशी, महसूल विभागात उत्कृष्ट काम करणारे दिलीप सणगर, संदीप भुतल, गजानन मेघमाळे, राजकुमार बोराटे, दिनकर कांबळे, दिलीप म्हापसेकर, राजू पचिंद्रे, अर्चना गुळवणी तसेच कृषी विभागातील रामदास पवार, शुभांगी देसाई, अमोल क्षीरसागर, किरण पाटील, नितीन भांडवले, शिल्पा इंगवले यांचा तर मतदार जागृतीमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ‘गोकुळ’ आणि मौर्य इंडस्ट्री यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
चौकट
ऋतुराज यांच्यासमवेत सेल्फीसाठी गर्दी
छत्रपती शाहू, पालकमंत्री पाटील यांच्यासमवेत अनेकांनी फोटो काढून घेतले. पालकमंत्री गडबडीत असल्याने अनेकांनी युवा आमदार ऋतुराज पाटील यांच्यासमवेत फोटो काढण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती.
चौकट
यांची होती उपस्थिती
यावेळी अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, प्रांताधिकारी वैभव नावडकर, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांच्यासह इतर विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.