चला... कोल्हापूरची अस्मिता वाचवूया!
By admin | Published: December 24, 2014 11:41 PM2014-12-24T23:41:05+5:302014-12-24T23:41:05+5:30
आज रंकाळा कृतज्ञता दिन : अनोख्या पद्धतीने करणार प्रदूषणाचा निषेध
कोल्हापूर : शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या रंकाळा तलावाला प्रदूषणामुळे अवकळा आली आहे. तलावाच्या संवर्धनासाठी व संरक्षणासाठी उद्या, गुरुवारी ‘रंकाळा कृतज्ञता दिवस’ साजरा होत आहे. यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी रंकाळाप्रेमींतर्फे केले.
रंकाळ्याची दुरवस्था रोखण्यासाठी रंकाळा संवर्धन व संरक्षण समितीतर्फे लोकचळवळ सुरू करण्यात आली आहे. संवर्धन समितीने यापूर्वी ‘एक हाक रंकाळ्यासाठी’ हा उपक्रम राबविला होता. गेल्या काही वर्षांपासून २५ डिसेंबर हा दिवस ‘रंकाळा कृतज्ञता दिवस’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षीही विविध उपक्रमांद्वारे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे रंकाळ्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न रंकाळाप्रेमी करणार आहेत.
सकाळी साडेसात वाजता रंकाळा चौपाटी येथील नवनाथ मंदिराजवळ एकत्र येऊन मुक्त व्यासपीठावर रंकाळ्याविषयी कविता, प्रदूषण मुक्तीबाबत उपाय, सूचना, तसेच तलावाबाबतच्या आठवणी व घटना, आदींचे मनोगत नागरिक उत्स्फूर्तपणे व्यक्त करणार आहेत. कोल्हापुरातील शाहीर पोवाड्याच्या माध्यमातून रंकाळ्याची व्यथा सादर करतील. रंकाळा, तसेच निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार होणार आहे. रंकाळा संवर्धन संरक्षण समिती, रंकाळा मॉर्निंग वॉकर्स ग्रुप, गुलमोहर ग्रुप, माऊली योग वर्ग व हास्य क्लब, खण विहार मंडळ यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
पुन्हा जलपर्णीचा धोका
अद्याप ५० टक्के सांडपाणी रंकाळ्यात मिसळते. त्यामुळे जलपर्णी पुन्हा वाढत असून, यावर तातडीचा उपाय म्हणून महापालिकेने आज, बुधवारपासून जलपर्णी काढण्याचे काम हाती घेतले. दूषित पाण्याने पाण्यावर तेलकट तवंग साचला आहे. दुर्गंधी, जंतूंचा प्रादुर्भाव परिसरात वाढला आहे.
काळी फीत लावून सकाळी साडेसहा वाजता रंकाळाप्रेमी रंकाळ्याभोवती फेरी मारतील. सायंकाळी सुरेश शुक्ल व सुनील सुतार यांच्यातर्फे ‘स्वरनिनाद-कोल्हापूर’ व ‘शब्दसुरांच्या झुल्यावर’ हे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. या उपक्रमासाठी रंकाळाप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
- यशवंत भालकर, दिग्दर्शक