पूर्वीच्या सर्वसंमत रेखांकनात बदल केल्यास आत्मदहन करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:23 AM2021-04-08T04:23:41+5:302021-04-08T04:23:41+5:30
कोपार्डे : करवीर तालुक्यातील भुये, भुयेवाडी येथील राष्ट्रीय महामार्गाचे मंत्रालयात सर्वसंमतीने मंजूर झालेले ३० जानेवारी २०१८ चे रेखांकन ...
कोपार्डे : करवीर तालुक्यातील भुये, भुयेवाडी येथील राष्ट्रीय महामार्गाचे मंत्रालयात सर्वसंमतीने मंजूर झालेले ३० जानेवारी २०१८ चे रेखांकन कायम ठेवावे. जर यात बदल केला आणि भूसंपादनासाठी अधिकारी आले, तर आत्मदहन करू, असा निर्वाणीचा इशारा भुये, भुयेवाडीतील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधिकारी वसंत पंधारे यांना निवेदनाद्वारे दिला.
बुधवारी माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली या दोन गावचे शेतकरी प्रतिनिधी देव पाटील, सरपंच सचिन देवकुळे यांनी पंधारे यांना लेखी निवेदन दिले. यावेळी चंद्रदीप नरके यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मंत्रालयात मंत्री, लोकप्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी व प्रकल्प अधिकारी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत सर्वसंमतीने राज्यमार्ग -१९४ चे रुंदीकरण करून राष्ट्रीय महामार्ग करण्याचे रेखांकन करण्यात आले होते. याचे फायदे-तोटे तपासून या राज्यमार्गाचे रुंदीकरण करण्याचे ठरले होते. तसे सर्वमताने रेखांकन करण्यात आले होते. त्याला मंजुरीही मिळाली होती. यामुळे सर्व भुये, भुयेवाडी गावातील शेतकरी, ग्रामस्थांना या रेखांकनानुसार आपली जमीन व स्थावर मालमत्ता किती जाणार, याचे नियोजन केले होते. पण या रेखांकनात २०२० मध्ये लॉकडाऊनच्या काळात बदल करण्यात आला. गुप्त भूसंपादनाच्या हालचाली सुरू झाल्यानंतर याबाबत ग्रामस्थांनी कार्यालयात निवेदने दिली होती. पण याकडेही का दुर्लक्ष करण्यात आले, असा सवाल नरके यांनी अधिकाऱ्यांना केला.
नरके म्हणाले, आमचा रस्ते प्रकल्पाला विरोध नाही. पण शेतकरी व ग्रामस्थांचे नुकसान टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी व शेतकरी यांची बैठक त्यावेळच्या प्रकल्प अधिकाऱ्यांबरोबर झाली होती. त्यात सर्वमताने मंजूर रेखांकनाला कोणाच्या आदेशाने बगल दिली आहे, याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी नरके यांनी केली.
यावेळी प्रकल्प अधिकारी वसंत पंधारे यांनी या रेखांकनाची सविस्तर माहिती घेऊन ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या हिताचे रेखांकन कसे करता येईल याबाबतचा सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवतो, असे सांगून, सर्वांना याबाबत विश्वासात घेतले जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी बाबासाहेब पाटील, विक्रम पाटील, जयसिंग पाटील उपस्थित होते.
फोटो : ०७ भुये निवेदन
माजी आ. चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली भुये, भुयेवाडी गावचे शेतकरी प्रतिनिधी देव पाटील, सरपंच सचिन देवकुळे यांनी लेखी निवेदन दिले.