सरकारी आश्रयदाते सेलिब्रिटींचे तुणतुणे बंद करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:21 AM2021-02-07T04:21:21+5:302021-02-07T04:21:21+5:30
कोल्हापूर : आम्ही घुसखोर, आतंकवादी नाही, शेतकरी आहोत, आम्हाला देशप्रेम तुमच्याकडून शिकण्याची अजिबात गरज नाही. सरकारचे लाभार्थी, आश्रयदाते म्हणून ...
कोल्हापूर : आम्ही घुसखोर, आतंकवादी नाही, शेतकरी आहोत, आम्हाला देशप्रेम तुमच्याकडून शिकण्याची अजिबात गरज नाही. सरकारचे लाभार्थी, आश्रयदाते म्हणून शेतकऱ्यांच्या विरोधात ट्विटरवरून टिवटिव करत असाल, करोडो लाेकांनी दिलेल्या प्रेमाला विसरणार असाल तर तुमचे तुणतुणे कायमचे बंद करू, असा गर्भित इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी बॉलीवूड व क्रिकेटमधील सेलिब्रिटींना दिला आहे.
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या आवाहनानुसार शनिवारी दुपारी कोल्हापुरातही चक्का जाम आंदोलन झाले. पोलिसांनी रस्ता अडवण्यास मज्जाव केल्यानंतर रस्त्यावरच ठिय्या मारत राजू शेट्टी यांनी केंद्र सरकार आणि ट्विटरद्वारे शेतकरी आंदोलनाची बदनामी करणाऱ्या सेलिब्रिटींवर चौफेर टीका केली. शेट्टी म्हणाले, तुम्ही जरूर सरकारचे लाभार्थी असाल; पण शेतकऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा, त्यांच्या देशभक्तीवर शंका घेण्याचा अधिकार कुठल्याही सरकारी तुकड्याकडे डोळे ठेवून बसलेल्या तथाकथित सेलिब्रिटींना दिलेला नाही. केंद्र सरकारवर टीका करताना शेतकरी आंदोलन दडपण्याचे प्रयत्न सरकारने सोडावेत, नाही तर त्यांना खूप महागात पडेल. महाराष्ट्रातील सर्व शेतकरी घेऊन दिल्लीला धडक देऊ, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.
चौकट ०१
तर आर्थिक रसदही तोडू
शांततेने चाललेल्या आंदोलनात अप्प्रवृत्ती घुसवून, तिरंग्याचा अवमान करण्याचाही प्रयत्न केला गेला. शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठीच हे सर्व केले आहे, तरीदेखील आम्ही अजून संयम दाखवून आहोत, त्याचा अंत पाहू नका. आंदोलनस्थळाच्या सोईसुविधा तोडून नाकाबंदी करत असाल तर देशातील करसंकलनाची महत्त्वाची संस्था असलेल्या दिल्लीतील जीएसटी आणि आयकर भवनला शेतकऱ्यांचा गराडा घालून केंद्र सरकारची सर्व रसद तोडू, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.
प्रतिक्रिया
दिल्लीतील आंदोलनकर्ते शेतकरी एकटे नाहीत, त्यांच्या मागे देशातील सर्व समाज उभा आहे, हा संदेश देण्यासाठीच हे चक्का जामचे आंदोलन केले. पण, सरकारी यंत्रणेवर दबाव आणून हे देखील मोडून पाडण्याचे काम होत असेल तर येथून पुढे आम्ही शांततेने आंदोलन करू, हे गृहीत धरू नका.
राजू शेट्टी, माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना