नांदणीचा पिण्याचा पाणीप्रश्न सोडवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:22 AM2021-03-14T04:22:37+5:302021-03-14T04:22:37+5:30
जयसिंगपूर : आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विशेष प्रयत्नांमधून शिरोळ तालुक्यामधील प्रमुख जिल्हामार्ग गतवर्षी राज्यमार्गामध्ये समाविष्ट करण्यात आले. ...
जयसिंगपूर : आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विशेष प्रयत्नांमधून शिरोळ तालुक्यामधील प्रमुख जिल्हामार्ग गतवर्षी राज्यमार्गामध्ये समाविष्ट करण्यात आले. या सर्व मार्गांचे मजबुतीकरण करण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये जवळपास २४ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. यातील बहुतांशी मार्ग नांदणी गावाशी जोडले जातात. त्यामुळे मंत्री यड्रावकर यांच्या प्रयत्नातून झालेल्या कामाबद्दल नांदणी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने नांदणीसाठी कृष्णा नदीवरून पाणीपुरवठा योजना होण्याबाबत मंत्री यड्रावकर यांना निवेदन देण्यात आले. या विषयाबाबत तातडीने पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे बैठक लावून नांदणीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री यड्रावकर यांनी यावेळी दिली.
यावेळी सरपंच संगीता तगारे, मीनाक्षी कुरडे, युनुस पटेल, संजय बोरगावे, प्रकाश लठ्ठे, पोपट बोरगावे, बाळगोंड खंजिरे, प्रतिमा बोरगावे, अजय कारंडे, दिलीप परीट, किरण आंबी, जयंत देवकते, महावीर पाटील, विनायक कोळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो - १३०३२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - नांदणी (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीच्या वतीने राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला.