एस.टी.च्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवू
By admin | Published: June 16, 2015 12:53 AM2015-06-16T00:53:45+5:302015-06-16T01:16:50+5:30
राजेश क्षीरसागर : महाराष्ट्र एस. टी. कामगार सेनेचा मेळावा
कोल्हापूर : एस. टी. कर्मचाऱ्यांनी गटबाजीला खतपाणी न घालता, सर्वांनी हातात-हात घालून एकदिलाने काम करावे, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. शासनदरबारी प्रलंबित असणारे कर्मचाऱ्यांचे प्रश्न निश्चितपणे सोडवू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. शिवसेनाप्रणीत महाराष्ट्र एस. टी. कामगार सेनेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सोमवारी शाहू स्मारक भवनातील मेळाव्यात ते बोलत होते. एस. टी. कामगार सेनेचे राज्यसरचिटणीस सुनील गणाचार्य अध्यक्षस्थानी होते.
आमदार क्षीरसागर म्हणाले, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी ‘उठाव लुंगी, बजाओ पुंगी’ असे म्हणत मराठी माणसांच्या कल्याणासाठी आवाज उठविला होता. आजपर्यंत शिवसेनेने जी आंदोलने केली ती यशस्वी करून दाखविली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सहा आमदार शिवसेनेचे आहेत, पण त्यामानाने एस. टी. कामगार सेनेच्या सदस्यांची संख्या कमी आहे, ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे पुढील काळात सर्वांनी हातात-हात घालून काम करा, आपली ताकद वाढवा, तुमच्या ज्या मागण्या अथवा प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना भेटू. जे आगारप्रमुख तुमच्यावर अन्याय करतील त्यांना शिवसेना त्रास दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. शिवसेना शुक्रवारी (दि. १९) सुवर्णमहोत्सवी वर्षात पर्दापण करत आहे. त्यानिमित्त आयोजित भगवा सप्ताहात आपण सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
सुनील गणाचार्य म्हणाले, एस. टी. कामगार सेनेच्या प्रत्येक सभासदाने समन्वय, संवाद साधावा. त्यामुळे तुमची वज्रमूठ आणखी घट्ट होईल. एस. टी. मध्ये अनेक कामगार संघटना आहेत, पण आपल्या संघटनेने २५ वर्षे पूर्ण केले आहेत, परंतु, इतर संघटनांचे तसे नाही. एस. टी. कर्मचाऱ्यांवर जो अन्याय करेल त्याला धडा शिकविला जाईल.
संघटनेचे विभागीय कार्याध्यक्ष संजीव सलगर म्हणाले, अपघात झाल्यावर एस. टी. कर्मचाऱ्याला (चालकाला) न्यायालयात स्वत: जामीन द्यावा लागतो. जामीन देण्याची जबाबदारी ही एस. टी. प्रशासनाची आहे पण, ते जबाबदारी झटकतात. त्याचबरोबर गरजेनुसार आगारप्रमुखांची नियुक्ती झाली पाहिजे.
सांगलीचे विलास कदम म्हणाले, काही कामगार नेते अलिबाबा चाळीस चोराची भूमिका बजावत आहेत. ते कर्मचाऱ्यांवर अन्याय करीत आहेत. त्यांचा बंदोबस्त व्हावा. यावेळी संघटक सचिव हिरेन रेडेकर, उपाध्यक्ष प्रकाश हंकारे यांची भाषणे झाली.
दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळविल्याबद्दल सुप्रिया भीमराव पाटील हिचा व आजरा आगारातील अनिल जाधव यांनी एस. टी. कामगार संघटनेत प्रवेश केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. विभागीय अध्यक्ष के.एन. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी राहुल हिरवे, हर्षल पाटील यांच्यासह एस. टी. कामगार सेनेचे सभासद उपस्थित होते. विभागीय सचिव यांनी दीपक घाटगे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)