कोल्हापुरातील सर्व व्यापार सुरू करून देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:17 AM2021-06-11T04:17:30+5:302021-06-11T04:17:30+5:30
कोल्हापूर : लवकरच जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन लवकरात लवकर मार्ग काढून सर्व व्यापार सुरू करून देऊ, अशी ग्वाही खासदार ...
कोल्हापूर : लवकरच जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन लवकरात लवकर मार्ग काढून सर्व व्यापार सुरू करून देऊ, अशी ग्वाही खासदार संजय मंडलिक यांनी गुरुवारी दिली.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजच्या शिष्टमंडळाने खासदार मंडलिक यांची घरी भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाशी चर्चा करताना मंडलिक यांनी हे आश्वासन दिले.
चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, लॉकडाऊनमुळे व्यापार बंदला दोन महिने उलटून गेले. आता सरकारने व्यापाऱ्यांचा अंत न पाहता व्यापार सुरू करण्यास परवानगी द्यावी. या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी शासनाचे सर्व नियम पाळत कोणतीही घोषणा न देता बुधवारी आंदोलन केले. मागण्यांचे फलक हातात घेत शहरातील जवळपास दोन हजार व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाच्या दारात थांबून लक्ष वेधले. दोन महिन्यांपासून जीवनावश्यक, अत्यावश्यक सोडून इतर सर्व व्यापार बंद असल्याने व्यापाऱ्यांच्या खिशात पैसे शिल्लक नाहीत. व्यापाऱ्यांना लाइट बिल, टेलिफोन बिल, पाणीपट्टी, जीएसटी, घरफाळा, विम्याचे हप्ते, व्यवसाय परवाना, प्रोफेशनल टॅक्स आणि इतर शासनाचे कर भरणे अडचणीचे झाले आहे. खासगी सावकारांकडून सोने, वाहने व इतर मौल्यवान वस्तू गहाण ठेवून व्याजाने पैसे घेण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. यामुळे सरसकट सर्व व्यापार सुरू करण्यास परवानगी द्यावी.
यावेळी चेंबरचे उपाध्यक्ष व फूटवेअर्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव पोवार, प्लायवूड असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील, मानद सचिव, स्टोन ट्रेडर्स असोसिएशनचे सचिव धनंजय दुग्गे, माजी अध्यक्ष प्रदीप कापडिया, कन्झ्युमर असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत शिंदे, मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित कोठारी, संचालक विज्ञानंद मुंढे, माजी नगरसेवक तौफीक मुल्लाणी, कापड व्यापारी संघाचे अध्यक्ष संपत पाटील आदी उपस्थित होते.
फोटो : १००६२०२१- कोल- मंडलिक निवेदन
कोल्हापुरातील सर्व दुकाने, व्यापार सुरू करण्यास परवानगी मिळावी, या मागणीचे निवेदन खासदार संजय मंडलिक यांना चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजच्या शिष्टमंडळातर्फे देण्यात आले. यावेळी संजय शेटे, शिवाजीराव पोवार, संजय पाटील, धनंजय दुग्गे, प्रदीप कापडिया आदी उपस्थित होते.