आंबेओहोळमध्ये पाणी साठले पुनर्वसनासाठी सकारात्मक राहू या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:17 AM2021-06-21T04:17:08+5:302021-06-21T04:17:08+5:30
उत्तूर : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथील प्रकल्पात पाणी साठ्यास सुरुवात झाली याचे समाधान वाटते. मात्र धरणग्रस्तांचे पुनर्वसन ...
उत्तूर : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथील प्रकल्पात पाणी साठ्यास सुरुवात झाली याचे समाधान वाटते. मात्र धरणग्रस्तांचे पुनर्वसन रखडले यांची खंतही वाटते. यासाठी सकारात्मक राहून प्रश्न सोडवू या, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले.
समरजित घाटगे म्हणाले, प्रकल्पात पाणीसाठा झाल्याने उत्तूर, गडहिंग्लज परिसर सुजलाम्-सुफलाम् होणार आहे. कै. बाबासाहेब कुपेकर यांनी हे धरण उभारण्याचे स्वप्न पाहिले ते सत्यात उतरले. त्यांच्या पश्चात पूर्ण होऊन या धरणात पाणीसाठा होत आहे. त्याचा मनस्वी आनंद आहे.
युती शासनाच्या काळात या प्रकल्पास मंजुरी मिळाली. सव्वा टीएमसी पाणी क्षमतेचे या प्रकल्पास ३० कोटी रुपये निधीची तरतूद केली होती. मात्र, या मंजुरीनंतर सत्तांतर होऊन आघाडीचे सरकार सत्तेत आले. आघाडी सरकारच्या राजकीय इच्छाशक्तीअभावी या प्रकल्पाचे काम अनेक वर्षे रखडले. परिणामी प्रकल्पाची किंमत वाढत गेली. २०१८ मध्ये ती २३० कोटीपर्यंत गेली. निधीअभावी पुन्हा काम थांबले. निधीअभावी थांबलेले काम पूर्ण होण्यासाठी २०१८ मध्ये मी स्वत: तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून २२७ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद झाली. १८ वर्षांत धरणाचे २५ टक्के काम झाले होते आणि २२७ कोटींचे पॅकेज दिल्यानंतर दीड वर्षात उर्वरित काम झाले. सत्तांतरानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. धरणाच्या कामासह पुनर्वसनासाठी निधी उपलब्ध असतानाही त्याचा विनियोग योग्य पद्धतीने केला नाही. त्यामुळे धरणग्रस्तांमध्ये अस्वस्थता पसरून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. जर धरण पूर्ण झाले तर आपले पुनर्वसन होणार नाही. त्यामुळे त्यांनी आधी पुनर्वसन मगच धरण अशा पद्धतीची भूमिका घेतली. यावर मी स्वत: धरणस्थळी जाऊन विस्थापित शेतक-यांबरोबर चर्चा केली होती. प्रकल्पाच्या कामास चालना मिळाली.