गनिमी काव्याने सरकारला धडा शिकवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:21 AM2021-03-24T04:21:54+5:302021-03-24T04:21:54+5:30
कोल्हापूर : पाऊस चांगला पडावा, पर्यावरण जपावे, जंगल वाढले पाहिजे म्हणून आम्हाला जंगलातून बाहेर काढले, शेतीला व पिण्यासाठी लोकांना ...
कोल्हापूर : पाऊस चांगला पडावा, पर्यावरण जपावे, जंगल वाढले पाहिजे म्हणून आम्हाला जंगलातून बाहेर काढले, शेतीला व पिण्यासाठी लोकांना मिळावे म्हणून धरणक्षेत्रातील नागरिकांना बाहेर काढले, पण पुनर्वसनही केले नाही. अनेक वर्षे आम्ही शांततेने आंदोलन केले. आता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने आंदोलन करून सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी शपथ मंगळवारी प्रकल्पग्रस्तांनी अभयारण्याच्या ठिकाणी घेतली.
चांदोली अभयारण्य व वारणा धरणग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे यासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या २५ दिवसांपासून आंदाेलन सुुरू आहे. जिल्हाधिकारी पुनर्वसनाबाबत सकारात्मक असताना पुनर्वसनाशी संबंधित विभागांकडून या दिवसांत ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे जागतिक जल दिनाचे औचित्य साधून या अभयारण्यग्रस्तांनी हे अभिनव आंदोलन केले. यावेळी आजपर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलने केली व काही मागण्या मान्य करून घेतल्या; परंतु पुढल्या काळात जर आमचे प्रश्न सुटले नाहीत तर आम्ही गनिमी काव्याने सरकारला धडा शिकवू, अशी शपथ घेण्यात आली. यावेळी मारुती पाटील, भगवान काळे, अशोक पाटील, आनंदा आमकर, दगडू पाटील, सुरेश पाटील, पांडुरंग कोठारी, भगवान बोडके, शंकर पाटील, शामराव उंडे, शामराव पाटील उपस्थित होते.
--
फोटो नं २३०३२०२१-कोल-श्रमिक मुक्ती दल
ओळ : प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. याअंतर्गत बुधवारी अभयारण्याच्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांनी गनिमी काव्याने आंदोलन करण्याची शपथ घेतली.
--