बनावट उच्चवर्गीय ओबीसींना मतपेटीद्वारे धडा शिकवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:19 AM2020-12-26T04:19:58+5:302020-12-26T04:19:58+5:30
कोल्हापूर : लाभांसाठी उच्चवर्गीय समाजातील लोक ओबीसींचे बनावट दाखले काढून निवडणुका लढवत आहेत. हे खऱ्या ओबीसींच्या हक्कांवरील अतिक्रमण आहे. ...
कोल्हापूर : लाभांसाठी उच्चवर्गीय समाजातील लोक ओबीसींचे बनावट दाखले काढून निवडणुका लढवत आहेत. हे खऱ्या ओबीसींच्या हक्कांवरील अतिक्रमण आहे. अशा बनावट ओबीसींना मतपेटीद्वारे धडा शिकवू, असा निर्धार ओबीसी सेवा फौंडेशनच्या कोल्हापुरात झालेल्या बैठकीत करण्यात आला.
दैवज्ञ बोर्डिंगमध्ये झालेल्या या बैठकीत ओबीसी एकतेचा नारा देण्यात आला. ही बैठक शिवाजी मालकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
बनावट दाखल्याद्वारे घुसखोरी करणाऱ्यांना मतदान तर करायचे नाही; उलट असे जातीचे दाखले देऊ नयेत यासाठी थेट मुख्यमंत्री यांच्यापर्यंत तक्रार करण्याचेही बैठकीत ठरले. पुढील वर्षी होणाऱ्या जनगणनेत जातवार जनगणना करावी, अशा मागणीचा ठरावही करण्यात आला.
बैठकीत मार्गदर्शन करताना फौंडेशनचे अध्यक्ष दिगंबर लोहार यांनी आपल्या भावी पिढीच्या संरक्षणासाठी खऱ्या ओबीसी उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कार्यरत राहावे असे आवाहन केले. बोगस जातीच्या दाखल्याची चौकशी करावी, असे रफिक शेख यांनी सांगितले. सयाजी झुंझार यांनी उच्चवर्गीय ओबीसींना मतपेटीतून धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सांगितले.
सुभाष गुरव यांनी ओबीसी आरक्षित प्रभागातून निवडणूक लढवणाऱ्या उच्चवर्गीयांना पराभूत करण्यासाठी संघटित व्हा, असे आवाहन केले. यावेळी पी. ए. कुंभार, गजानन विभुते, सुभाष झगडे, रेखा परमाळे, मालती सुतार, किशोर लिमकर, सरदार झेंडे, सागर भोसले, संजय सुतार, सोपान सुतार, मधुकर कुंभार, वसंतराव कुंभार, वसंतराव काजवे, महेश उबारे, चंद्रकांत जंगम, गणेश बुरसे, अनिल सुतार, शिवाजी आंबेकर यांनी मनोगत व्यक्त केले. चंद्रकांत कोवळे यांनी स्वागत केले.