सांगली फाट्यावरील टोल नाके नदीत फेकून देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:31 AM2021-02-25T04:31:39+5:302021-02-25T04:31:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूरजवळच्या सांगली फाट्यावरील टोल नाक्यांमुळे दररोज मोठ्या प्रमाणात अपघात होऊन प्रवाशांचा मृत्यू होत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूरजवळच्या सांगली फाट्यावरील टोल नाक्यांमुळे दररोज मोठ्या प्रमाणात अपघात होऊन प्रवाशांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे मृत्यूचा सापळा बनलेले हे टोल नाके त्वरित हटवावेत अन्यथा ते पोकलेनने काढून नदीत फेकून देऊ, असा इशारा बुधवारी अर्थमुव्हिंग कॉन्ट्रॅक्टर्स ॲण्ड मशिनरी ओनर्स असोसिएशनने दिला. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना असोसिएशनने दिले.
यावेळी अध्यक्ष संजय चौगुले म्हणाले, रात्रीच्यावेळी हे टोल नाके दिसत नसल्याने तेथील दुभाजकावर धडकून अपघात होत आहेत. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे. या रस्त्याची अपुरी कामे राज्य शासनाने पूर्ण केल्याने कोल्हापूर - सांगली मार्गावरील टोल नाके बंद असून, त्यांचा वापर होत नाही. त्यामुळे प्रशासनाने सर्व टोल नाके येथून हटवावेत. पुढील पंधरा दिवसात यावर कार्यवाही झाली नाही तर असोसिएशनतर्फे आंदोलन करुन हे टोल नाके डोझर, पोकलेन मशीनने उखडून नदीत फेकून दिले जातील, असा इशारा देण्यात आला. यावेळी किशोर शहा, शिवराज नाळे, ऋषिकेश यादव, महेश दिवेकर, समीर शेलार, संतोष पाटील, शिवाजी जाधव, राजाराम यमगर, कीर्ती पाटणे यांच्यासह सभासद उपस्थित होते.
-
---