खराब मॅटप्रकरणी गुन्हा दाखलसाठी शाहूपुरी पोलिसांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 02:13 PM2020-08-19T14:13:35+5:302020-08-19T14:14:54+5:30
शिंगणापूर येथील विद्यानिकेतनच्या खराब कुस्ती मॅट प्रकरणी अखेर संबंधित पुरवठादारावर गुन्हा दाखल करण्याबाबत जिल्हा परिषदेकडून शाहूपुरी पोलिसांना पत्र देण्यात आले. राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांनी गुन्हा दाखल न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता.
कोल्हापूर : शिंगणापूर येथील विद्यानिकेतनच्या खराब कुस्ती मॅट प्रकरणी अखेर संबंधित पुरवठादारावर गुन्हा दाखल करण्याबाबत जिल्हा परिषदेकडून शाहूपुरी पोलिसांना पत्र देण्यात आले. राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांनी गुन्हा दाखल न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता.
गतवर्षी या मटच्या दर्जाबाबत जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये चर्चा होऊन संबंधित पुरवठादार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र यानंतर या प्रकरणामध्ये पुढे काहीच झाले नाही. जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांचेही मत याबाबत मागवून घेण्यात आले. मात्र अनेक महिने उलटले तरी गुन्हा दाखल न झाल्याने विजय बोरगे संतप्त झाले आहेत.
यानंतर शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी यामध्ये लक्ष घालून मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मित्तल यांनी संबंधित पुरवठादारावर गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश दिले. यानंतर शिक्षणाधिकारी जयश्री जाधव यांनी संबंधित करार आणि अन्य कागदपत्रांसह गुन्हा दाखल करण्याबाबतचे पत्र शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिले.