लेटकमर्सची संघटनेच्या खांद्यावर बंदूक
By admin | Published: November 23, 2014 12:46 AM2014-11-23T00:46:47+5:302014-11-23T00:46:47+5:30
जिल्हा परिषद : पदाधिकारी, कर्मचारी संघर्ष पेटणार; दबावतंत्राचा प्रयोग
कोल्हापूर : येथील जिल्हा परिषदेमधील काही कर्मचारी ‘आम्ही जनतेचे सेवक आहोत’ हे विसरून मनमानी पद्धतीने कधीही येतात आणि कधीही जातात. ते कार्यालयातील प्रस्थापित बनले आहेत. त्यांना दुखाविण्याची हिंमत साहेबालाही होत नाही. उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी प्रशासनाला शिस्त लावण्यासाठी लेटकमर्सना कार्यालयाच्या बाहेरच रोखल्याने ‘इगो’ दुखावला. लेट आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी संघटनेच्या खांद्यावर बंदूक ठेवत आंदोलनाच्या माध्यमातून दबावतंत्राचा प्रयोग झाला. याला अप्रत्यक्षपणे वरिष्ठ अधिकारीही खतपाणी घालत असल्याचे पदाधिकारी यांच्या निदर्शनास आले आहे. लेटकमर्सना पाठीशी घालणारे अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या ‘रडारवर’ येणार आहेत. यामुळे पदाधिकारी, कर्मचारी, अधिकारी संघर्ष पेटणार आहे.
जिल्हा परिषदेमध्ये शासकीय सुटी वगळता अन्य दिवशी जिल्ह्यातून अनेक लोक कामानिमित्त येत असतात. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या चंदगड तालुक्यातील सर्वसामान्य व्यक्तीला परिषदेमध्ये कामासाठी दहा वाजेपर्यंत पोहोचण्यासाठी पहाटे पाच वाजता घर सोडावे लागते. इतकी धडपड करून जिल्हा परिषदेच्या कार्यालयात आल्यानंतर संबंधित विभागामध्ये साहेब खुर्चीवर असतीलच आणि काम होईलच याची शाश्वती नाही. कार्यालयात आल्यानंतर पाट्या टाकणे, काम सोडून चहा व अन्य कारणांसाठी फिरत राहणे, मोबाईलवर गप्पा मारण्यात मग्न असणे, हे नित्याचेच आहे.
मॅन्युअल हजेरी पत्रकात अॅडजेस्टमेंट करता येते. त्यामुळे शासनानेच बोयामेट्रिक हजेरी कार्यान्वित केली. तरीही परिषदेधील विविध विभागात मॅन्युअल हजेरी पत्रकाचा वापर होत असल्यास सामान्य प्रशासनाचे प्रमुख डोळ्यांवर झापड ओढून इतके दिवस का गप्प होते, असाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गतिमान प्रशासनाचा टेंबा मिरवायचे आणि प्रत्यक्षात कामासाठी येणाऱ्याला हेलपाटे मारायला लावायचे हा प्रशासनाचा जुनाच अनुभव आहे. परिषदेमधील बहुतांश विभागात एजंटांना मान मिळतो, त्यांच्यामार्फत आलेली कामे रात्री उशिरापर्यंत करून दिली जातात, अशा तक्रारी खासगीत बोलताना जिल्हा परिषदेचे सदस्यच करीत असतात. मात्र, परिषदेच्या इतिहासात इतक्या धाडसीपणे आणि व्यापकपणे लेटकमर्सना धडा शिकविण्याची हिंमत यापूर्वी कोणीही केली नव्हती. त्यामुळे लेटकमर्सची संख्या ११५ पर्यंत जाऊन पोहोचली. (प्रतिनिधी)