शिवाजी विद्यापीठात उत्साहात निघाली ग्रंथदिंडी, वाचनसंस्कृतीचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 01:06 PM2019-02-22T13:06:33+5:302019-02-22T13:13:28+5:30
विविध विषयांवर प्रबोधन करणारी पथनाट्य, संदेश फलक आणि पारंपारिक वाद्यांचा गजर, विद्यार्थी-विद्यार्थीनींचा उर्त्स्फूत सहभाग अशा उत्साही वातावरणात शुक्रवारी शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित ग्रंथदिंडी पार पडली. या दिंडीतून वाचनसंस्कृतीचा जागर करण्यात आला.
कोल्हापूर : विविध विषयांवर प्रबोधन करणारी पथनाट्य, संदेश फलक आणि पारंपारिक वाद्यांचा गजर, विद्यार्थी-विद्यार्थीनींचा उर्त्स्फूत सहभाग अशा उत्साही वातावरणात शुक्रवारी शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित ग्रंथदिंडी पार पडली. या दिंडीतून वाचनसंस्कृतीचा जागर करण्यात आला.
या दिंडीने विद्यापीठाच्या ५५ व्या दीक्षान्त समारंभाचा प्रारंभ झाला. कमला महाविद्यालय येथे सकाळी साडेआठ वाजता कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि ताराराणी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उदघाटन झाले.
फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये ग्रंथांची मांडणी केली होती. ‘जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘शहीद जवान अमर रहे’, अशा घोषणा देत ग्रंथदिंडी पुढे सरकत राहिली. विद्यार्थी-विद्यार्थीनींनी ‘वाचनबुद्धीचे खाद्य’, ‘वाचाल, तर वाचाल’, अशा विविध संदेश फलकांच्या माध्यमातून वाचनसंस्कृतीचा जागर केला. विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी गांधी टोप्या परिधान करून सहभागी झाले होते.
राजारामपुरी मेन रोड, माऊली चौक, सायबर चौक, दूरशिक्षण केंद्र मार्गे आलेल्या ग्रंथदिंडीचा लोककला केंद्राच्या परिसरात समारोप झाला. दिंडीमध्ये प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, नमिता खोत, डी. के. गायकवाड, ए. एम. गुरव, पी. डी. राऊत, अमित कुलकर्णी, आर. जी. कोरबू, एस. व्ही. थोरात, डी. बी. सुतार, एस. आर. लिहितकर, आदी सहभागी झाले.
पथनाट्यातून प्रबोधन
या दिंडीमध्ये शहाजी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ‘क्षयरोग एक भयानक वास्तव’ याविषयावरील, तर कमला महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी ‘स्त्री भ्रूण हत्या’ रोखण्याबाबत प्रबोधन करणारे पथनाट्य सादर केले. राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांचा गजर करत चैतन्य निर्माण केले.