महाविद्यालयातील पदभरतीसाठी ग्रंथपालांचे उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:28 AM2021-08-13T04:28:42+5:302021-08-13T04:28:42+5:30

कोल्हापूर : महाविद्यालयातील ग्रंथपालांच्या पदभरतीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापुरात गुरुवारी ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ साजरा करून गुरुवारी ग्रंथपालांनी विभागीय उच्च ...

Librarians go on hunger strike for college recruitment | महाविद्यालयातील पदभरतीसाठी ग्रंथपालांचे उपोषण सुरू

महाविद्यालयातील पदभरतीसाठी ग्रंथपालांचे उपोषण सुरू

Next

कोल्हापूर : महाविद्यालयातील ग्रंथपालांच्या पदभरतीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापुरात गुरुवारी ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ साजरा करून गुरुवारी ग्रंथपालांनी विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले. राज्य ग्रंथपाल महासंघ, आरोग्य विज्ञान महाविद्यालयीन ग्रंथालय व क्रीडाशिक्षक संघाच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येत आहे.

अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यपद भरतीच्या धर्तीवर ग्रंथपाल पदांची भरती तत्काळ सुरू करावी. दि. ४ मे २०२० रोजी पदभरतीवर निर्बंध लादण्याआधी ज्या महाविद्यालयांना शासन नियमानुसार पदभरतीची परवानगी मिळाली आहे. अशा महाविद्यालयांना तेथील पदाच्या मुलाखतीसाठी तातडीने परवानगी द्यावी. खासगी विनाअनुदानित संस्थेमधील ग्रंथपालांना ‘समान काम - समान वेतन’ हे धोरण ठेवून विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्धारित केलेल्या वेतनश्रेणीनुसार वेतन मिळाले पाहिजे, या मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी प्रारंभी आंदोलनकर्त्यांनी देशातील ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. राज्य ग्रंथपाल महासंघाचे केंद्रीय सदस्य अनिल सावरे, कोल्हापूर समन्वयक शुभदा जाधव, जे. यू. मुल्ला, अमित नावले, प्रतिभा पाचंगे, नीलिमा थोरात, मोहंमद शरीफ पटेल, हर्षदा सावरे, आदी आंदोलनात सहभागी झाले.

चौकट

शासन आदेश निघेपर्यंत आंदोलन

गेल्या दहा वर्षांपासून राज्यातील अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील पदभरतीची प्रक्रिया वेगवेगळ्या कारणांनी रेंगाळली आहे. त्यात ग्रंथपालपदाचाही समावेश आहे. ही पदभरती सुरू करून राज्यातील पात्रताधारकांना शासनाने न्याय द्यावा. जोपर्यंत पदभरतीचा शासन निर्णय निघणार नाही, तोपर्यंत संघटनेच्या माध्यमातून राज्यातील ग्रंथपाल साखळी उपोषण आंदोलन सुरू ठेवणार असल्याची माहिती अनिल सावरे यांनी दिली.

Web Title: Librarians go on hunger strike for college recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.