ई-बुकच्या जमान्यातही ग्रंथालये अबाधित
By Admin | Published: September 30, 2016 12:36 AM2016-09-30T00:36:40+5:302016-09-30T01:34:36+5:30
नंदकुमार काटकर : ग्रंथालय संचालनालय, राजा राम मोहन रॉय प्रतिष्ठानची कार्यशाळा
कोल्हापूर : सध्या ई जमाना आला आहे. मात्र, एखाद्या आवडत्या लेखकाचे पुस्तक आपल्या वेळेनुसार हातात घेऊन वाचण्याचे समाधान हे वेगळेच असते. त्यामुळे ई जमान्यातही ग्रंथालयांचे महत्त्व अबाधितच राहील, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी केले.
राजाराम महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालय आणि राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान (कोलकाता) यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी आयोजित एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते एस. आर. रंगनाथन, राजा राममोहन राय व सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
काटकर म्हणाले,नवीन तंत्रज्ञानामुळे आजची पिढी वाचनापासून काहीशी दूर गेल्यासारखी वाटते. त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी ग्रंथ चळवळ प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने शासनाच्या विविध योजनांची माहिती सार्वजनिक ग्रंथालयाच्या पदाधिकाऱ्यांना तसेच ग्रंथालय सेवकांना व्हावी, याकरिता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रंथालय उपसंचालक एस. एच. राठोड म्हणाले, राज्यात १२ हजार १४४ शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये आहेत. त्यापैकी ६८५ ग्रंथालये कोल्हापूर जिल्ह्णात असून ही बाब कौतुकास्पद आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी विजयकुमार जगताप यांनी प्रास्ताविकामध्ये कोल्हापूर जिल्ह्णातील ग्रंथालय चळवळीचा आढावा घेऊन संखयात्मक वाढीबरोबरच आता गुणात्मक वाढीसाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. यावेळी राजा राम मोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाताचे क्षेत्रिय अधिकारी अनंत वाघ यांनी विविध योजनांची माहिती, त्यांचे प्रस्ताव कसे करायचे याबाबत मार्गदर्शन केले. करवीर नगर वाचनालयाच्या ग्रंथपाल शेणई यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी सहायक ग्रंथालय संचालिका उज्ज्वला लोंढे, पुणे विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष एच. पी. पाटील, कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष तानाजीराव मगदूम यांच्यासह जिल्ह्णातील ग्रंथालयांचे पदाधिकारी, ग्रंथपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्णातील ग्रंथालय पदाधिकारी व ग्रंथपालांची कार्यशाळा बुधवारी राजाराम महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. यावेळी माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करताना मध्यभागी अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, डावीकडून हिंदुराव पाटील, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष तानाजीराव मगदूम, अनंत वाघ, ग्रंथालय उपसंचालक एस. एस. राठोड, प्रभारी सहाय्यक ग्रंथालय संचालिका उज्ज्वला लोंढे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी विजयकुमार जगताप.