कोल्हापूर जिल्ह्यातील ६७ खाणींनाच परवाना :पाच बॉक्साईट खाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 12:31 AM2018-04-06T00:31:38+5:302018-04-06T00:31:38+5:30
प्रवीण देसाई ।
कोल्हापूर : जिल्ह्यात खनिकर्म विभागाकडून अधिकृत परवाना असलेल्या ६७ खाणी असून त्यामध्ये ६० गौणखनिज (दगडखाणी) व चार बॉक्साईटसह तीन इतर खाणींचा समावेश आहे. या खाणींतूनच अधिकृतरित्या उत्खननास परवानगी आहे. याव्यतिरिक्त बेकायदेशीर उत्खननांवर छापे टाकून खनिकर्म विभागाकडून कारवाई केली जात आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील दगडखाणींच्या मोजणीला सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यात चंदगड, गडहिंग्लज, हातकणंगले, आजरा, शिरोळ, करवीर, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा या तालुक्यांत ६० दगडखाणी असून, यामधून गौणखनिजाचे उत्खनन होते. दगडखाणींमधून उत्खननाकरिता जिल्हा खनिकर्म कार्यालयातून पाच वर्षांचा परवाना दिला जातो.
मुदत संपण्यापूर्वी तीन महिने अगोदर नूतनीकरणाच्या प्रक्रियेसाठी संबंधित खाणचालकाने अर्ज करावयाचा आहे. या वेळेत हा अर्ज न केल्यास परवाना रद्द करण्याची तरतूद आहे.
प्रमुख खनिजांमध्ये जिल्ह्यात शाहूवाडी तालुक्यात तीन व भुदरगडमध्ये एक अशा बॉक्साईटच्या खाणी आहेत, तसेच लॅटेराईटची शाहूवाडी तालुक्यात एक व सिलिका सॅँडच्या राधानगरी तालुक्यात दोन खाणी आहेत. या खाणींमधून उत्खननाकरिता ३० वर्षांपर्यंतचा परवाना आहे. या परवानाधारक खाणींमधूनच खनिज उत्खननास जिल्हा खनिकर्म विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त होणारे उत्खनन हे बेकायदेशीर असून, गेल्या दोन महिन्यांत दोन ठिकाणी छापे टाकून कारवाई करण्यात आली आहे.
खाणींमधून किती ब्रास खनिजाचे उत्खनन झाले आहे; तसेच प्रमाणापेक्षा जास्त खोलीकरण केले आहे का? हे पाहण्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागाकडून व भूविज्ञान खनिकर्म संचलनालयाकडून ‘ईटीएस’ मशीनद्वारे पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ४७ दगडखाणींची मोजणी करण्यात आली आहे.यामध्ये चंदगड तालुक्यातील २१, गडहिंग्लज तालुक्यातील १८ व आजरा तालुक्यातील ८ खाणींचा समावेश आहे. उर्वरित दगडखाणींची मोजणीही सुरू असून येणाऱ्या काळात बॉक्साईटसह इतर प्रमुख खनिज खाणींची मोजणी होण्याची शक्यता आहे.
गौणखनिजाच्या उत्खननासाठी अल्प मुदतीचेही परवाने
खाणींव्यतिरिक्त दगड व मुरुमाच्या उत्खननासाठी महिन्याभराकरिता अल्प मुदतीचे परवाने देण्यात येतात. त्यामध्ये ५०० ब्रासपर्यंत उत्खननासाठी तहसीलदार, ५०१ ते २००० ब्रासपर्यंत प्रांताधिकारी व २००१ ते २५००० ब्रासपर्यंत ‘जिल्हा खनिकर्म’कडून परवानगी देण्यात येते.
जिल्ह्यात एकूण ६७ खाणींनाच उत्खननाचे परवाने देण्यात आले आहेत. त्याचबरोबर अल्पमुदतीचे परवानेही तहसीलदार, प्रांताधिकारी व जिल्हा खनिकर्म कार्यालय स्तरावर देण्यात येत आहेत. याव्यतिरिक्त होणारे उत्खनन हे बेकायदेशीर असून त्यावर वेळोवेळी कारवाई करण्यात आली आहे.
-अमोल थोरात,
जिल्हा खनिकर्म अधिकारी