अभय की जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:04 AM2019-02-04T00:04:33+5:302019-02-04T00:04:39+5:30

इंद्रजित देशमुख वास्तविक माउलींनी दैवी गुण सांगत असताना अभय या गुणाला प्रथम प्राधान्य दिले आहे. त्याचं कारण असं आहे, ...

Life of Abhay | अभय की जीवन

अभय की जीवन

googlenewsNext

इंद्रजित देशमुख
वास्तविक माउलींनी दैवी गुण सांगत असताना अभय या गुणाला प्रथम प्राधान्य दिले आहे. त्याचं कारण असं आहे, कारण हा खूप विलक्षण गुण आहे. साधकाच्या अंतर्यामी हा गुण असला की, साधक नित्य स्वयंपूर्णतेच्या आवेशात जगू लागतो. येथे अभय धारण करणं जितकं गरजेचं आहे तितकंच गरजेचं हे आहे की, त्या साधकाने अभयात जगणं म्हणजे कुणावर अवलंबून राहणं नव्हे, तर व्यक्ती, परिस्थिती आणि घटना या प्रत्येक घटकांशी सकारात्मक सदिच्छेने तोंड देणं होय.
मुळातच दैवी गुण म्हणायचं कशाला? तर ज्या गुणाची जोपासना किंवा संवर्धन केल्यानंतर जीव, जगत आणि जगदीश या सर्वांच्याबद्दल सुभाव निर्माण होतो आणि त्यातून परोपकाराची वांच्छना व्यक्त केली जाते. निव्वळ या कारणामुळेच आपण सगळेचजण दैवी आहोत, असं मला वाटतं. सात्त्विकवृत्तीची जोपासना हे या प्रकारचं दैवत्व अंगी असल्याशिवाय होतच नाही. आपण सगळेचजण आपल्या अस्तित्वाने इतरांचं अस्तित्व समृद्ध करू पाहतोय म्हणून आपण सगळेचजण दैवी आहोत. याच दैवत्वाच्या संवर्धनासाठी आवश्यक असणारे जे गुण आहेत ते गुण म्हणजे दैवी गुण होत आणि याच दैवी गुणांमधील पहिला गुण अभय हा आहे.
तसं पाहिलं तर मुळात आपण सगळेजण मूलत: अभियांकित आहोत; पण अज्ञान आणि अवास्तव स्वीकृती या दोषांमुळे आपण भयात अडकलेलो आहोत. महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर, ‘मुक्त होता परी, बळे झाला बद्ध’ अशी आमची अवस्था झालेली आहे. अज्ञान आणि अवास्तव स्वीकृती यामुळे स्वस्वरूपाबद्दल असावयाचा जाणीव भाव आमच्या ठायी निर्माण होत नाही किंवा झालाच तर आम्ही बोधापर्र्यंत पोहोचू शकत नाही. अभयात जगणं म्हणजे प्रचंड मुक्ततेत जगणं होय. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आणि कोणताही दबाव न धारण करता तुकोबारायांनी सांगितलेल्या
‘एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम।’
‘आणिकांचे काम नाही आता।’
किंवा त्याच तुकोबारायांच्या ‘आणिक नका पडू गबाळांचे भरी’ या वचनाप्रमाणे मी जगणार हा दृढ भाव आमच्या अंत:करणात आणि जगण्यात दिसला असता. अज्ञानामुळे आमची एवढी पारमार्थिक फसगत होते आणि आम्ही परमात्मप्राप्तीपासून दूर जातो.
या अज्ञानामुळेच तुकोबारायांनी सांगितलेल्या ‘तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी। देवासवे तुटी पडतोसी।’
या वचनाप्रमाणे आम्ही हा दैवी भाव अंगिकारायचं सोडून इतर नको त्या स्वीकृती अवास्तव स्वरूपात स्वीकारल्या की, आम्हाला भयांकित व्हावं लागतं. अगदी सामान्यपणाने बघायला गेलं तर एखाद्या गावामध्ये ज्याच्याकडे कोणत्याच प्रकारची भौतिक संपन्नता नाही, असा एखादा मनुष्य खूप मोकळेपणाने जगत असतोे; पण त्याच गावातील एखादा धनवान मनुष्य ‘आपल्याजवळ असलेले धन कुणी हिरावून नेले तर काय करायचे’ या भीतीने सतत भयात वास करीत असतो.
‘धन दारा पुत्र जन।
बंधू सोयरे पिशुन।
सर्व मिथ्या हे जाणून।
शरण रीघा देवासी।।’
असा उपदेश आमच्यासाठी असताना या सर्व खोट्या गोष्टींच्या खोट्या अस्तित्वाला आम्ही अंतिम अस्तित्व ठरवून जगू लागलो आणि तसेच आमचा क्षण आणि क्षण चिंतेने ग्रासला गेला. त्याचमुळे आम्ही मेल्यानंतर चिता आम्हाला जाळत असताना जो त्रास देऊ शकणार नाही, तो त्रास जिवंतपणी आम्हालाही चिंता देत आहे आणि आम्ही तो सहन करीत आहे. भयाची कितीतरी आवर्तने आमच्या भोवताली वेस्टली गेली आहेत आणि तुकोबारायांनी म्हटलेल्या, ‘माझा मीच झालो शत्रू’ या वचनाप्रमाणे आम्हीच ती ओढवून घेतलेली आहेत. नवनाथ ग्रंथामध्ये गुरू-शिष्यांच्या प्रवासकालीन संवादात गुरूच शिष्यासमोर भयभीत झालेला असतो आणि शिष्य गुरूच्या भयाची उकल करतो ती म्हणजे गुरूने स्वत:जवळ ठेवलेली सोन्याची वीट. या विटेचा त्याग केल्यावर गुरू भयमुक्त होतात. याचाच अर्थ जिथं अवास्तव स्वीकृती असते तिथे नक्की भीतीचा वास असतो.
इथे त्याग याचा अर्थ मर्यादित भोग असा होईल. याचसाठी आमचे तुकोबाराय ‘प्रपंच ओसरो।
चित्त तुझे पायी मूरो’ असं म्हणतात. प्रपंच ओसरणं अपेक्षित आहे आटणं नव्हे. याचाच अर्थ प्रपंचाबद्दल मर्यादेच्या पलीकडची आसक्ती नसावी, असा आचरणभाव आम्ही जोपासला तरच आम्ही खऱ्या अर्थाने अभयांकित बनू शकतो. तो त्याग करण्याचं शहाणपण आम्हाला लाभावं आणि आम्ही अखंड अभयांकित बनावं, एवढीच अपेक्षा.
(लेखक : संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनशील वक्ते आहेत)

Web Title: Life of Abhay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.