राजकीय वादातून घटना : आरळे येथील खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 09:57 AM2020-01-31T09:57:56+5:302020-01-31T10:00:01+5:30
यातील आरोपी सुरेश पाटील यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे न्यायालयात सिद्ध झाले; त्यामुळे न्यायालयाने पाटील यांना जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांचा तुरुंगवास अशी शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास करवीरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय भांगे यांनी केला.
कोल्हापूर : आरळे (ता. करवीर) येथील शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष असलेले पांडुरंग रामचंद्र देसाई (वय ५५) यांचा २१ फेबु्रवारी २००८ रोजी राजकीय वैमनस्यातून झालेल्या वादातून गोळीबार करून खून केल्याप्रकरणी आरोपी सुरेश भाऊसाो पाटील (वय ४३, रा. आरळे, ता. करवीर) यांना दोषी ठरवत गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एस. विठलानी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
गावातील सरपंच पदाची निवडणूक २००८ ला बिनविरोध झाली. त्या कारणाने भरत भाऊसाो पाटील व त्यांच्या गटातील कार्यकर्ते नाराज होते; त्यामुळे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हिंदुराव विष्णू पाटील व भरत पाटील या दोन राजकीय गटांमध्ये वैमनस्य झाले होते. या घटनेवरून २१ फेबु्रवारी २००८ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हिंदुराव पाटील यांच्या संस्थेच्या शाळेच्या पटांगणात भरत पाटील व त्यांच्या गटातील लोक काठ्या, कुºहाडी व तलवार, आदी शस्त्र घेऊन त्यांनी हिंदुराव पाटील गटातील लोक व संस्थेचे उपाध्यक्ष मृत पांडुरंग देसाई यांच्यावर हल्ला केला. दरम्यान, सुरेश पाटील यांनी आपल्याकडील बंदुकीने पांडुरंग देसाई यांच्यावर गोळीबार केला. त्यात ते मृत झाले. त्यानंतर पोलिसांनी भरत पाटील यांच्यासह पांडुरंग दिनकर पाटील, बाजीराव निवृत्ती पाटील, तानाजी मारूती पाटील, नामदेव निवृत्ती पाटील (सर्व रा. आरळे) यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
यातील आरोपी सुरेश पाटील यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे न्यायालयात सिद्ध झाले; त्यामुळे न्यायालयाने पाटील यांना जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांचा तुरुंगवास अशी शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास करवीरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय भांगे यांनी केला. सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी अन्य चार व वैद्यकीय अधिकारी व तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. यासोबतच न्यायवैद्य प्रयोगशाळेचा बॅलेस्टिक अहवाल व सरकारी वकील अॅड. एन. बी. आयरेकर यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. इतर आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली.