शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम देण्यासाठी आयुष्य: राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:54 AM2019-04-08T00:54:45+5:302019-04-08T00:54:50+5:30
हुपरी : सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळवून देण्यासाठीच आपण आयुष्यभर प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठीच साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी ...
हुपरी : सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळवून देण्यासाठीच आपण आयुष्यभर प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठीच साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून आपण बसत असतो. शेतकरी हिताविरोधी आपण कधीही भूमिका घेतलेली नसून माझ्या मिशीला आजपर्यंत कधीही खरकट लागलेले नाही. त्यामुळेच आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नी अगदी खुल्यापणाने सातत्याने रोखठोक भूमिका घेत असतो, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ हुपरी (ता.हातकणंगले) येथील हुतात्मा शंकर चिटणीस चौकात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. काँग्रेस पक्षाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा सत्कार माजी खासदार जयवंतराव आवळे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, या भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे समाजातील एकही घटक समाधानी नाही. अन्न सुरक्षा योजना चुकीच्या पद्धतीने राबवून गोरगरीब जनतेच्या चुलीत पाणी ओतण्याचे व बेरोजगारी वाढवून तरुणांचे आयुष्य बरबाद करण्याचे काम सरकारने केले आहे. या सत्ताधुंद सरकारला घराकडे पाठविण्याची वेळ आता आली आहे.
माजी खासदार जयवंतराव आवळे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा व पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. मात्र, आपल्यातल्या अंतर्गत मतभेदांनीच विरोधकांना मोठे करण्याचे काम केले आहे. आता यापुढे एकमेकांच्या पायात पाय न घालता हातात हात घालून पुढे जाण्याचे काम आपणा सर्वांना करावे लागणार आहे. नूतन जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष आता नव्याने उभारी घेऊ लागला आहे. यापुढील सर्व निवडणुका आपण जिंकून काँग्रेस पक्षाची ताकद वाढवूया, असे आवाहन यावेळी केले.
स्वागत व प्रास्ताविक राजूबाबा आवळे यांनी केले. यावेळी राजेश पाटील बी. के. चव्हाण, बाबासाहेब दबडे, सासने, प्रकाश पाटील, आप्पासाहेब एडके, नूरमहम्मद मुजावर, रेवती पाटील, संभाजी पोवार आदींनी मनोगते व्यक्त केले. विलासराव गाताडे, बाबासाहेब चौगुले, राहुल आवाडे, किरण पोतदार, बाळासाहेब जाधव, जालिंदर पाटील, नानासाहेब गाट, आदी यावेळी उपस्थित होते.
नातवाचा नाद सोडून शेट्टी यांच्याबरोबर
तत्कालीन खासदार बाळासाहेब माने यांचे जुने सहकारी संभाजी पोवार एक जुनी आठवण सांगताना म्हणाले, मानेसाहेबांच्या मनामध्ये सर्वसामान्य शेतकºयांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा तीव्र होती. त्यांची इच्छापूर्ती करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम खासदार राजू शेट्टी यांनी खºया अर्थाने पूर्ण केले आहे. त्यामुळेच आपण त्यांच्या नातवाचा नाद सोडून शेतकºयांसाठी आपले आयुष्य वेचणाºया खासदार राजू शेट्टी यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.