गवताच्या चार पेंढ्यांसाठी गेला उमद्या तरुणाचा जीव, आरडेवाडीतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 11:55 AM2020-08-21T11:55:06+5:302020-08-21T11:56:28+5:30
गाव करवीर तालुक्यातील आरडेवाडी. डोंगराच्या कडेला असलेली फक्त सहा गुंठे जमीन. त्यात पावसाळ्यातच फक्त गवत येते. त्याची किंमत केली तरी कसेबसे हजार-दोन हजार रुपये; परंतु ते कापायचे कुणी म्हणून सख्खे चुलतभाऊ एकमेकांशी भिडले आणि एका उमद्या तरुणाचा त्यात हकनाक बळी गेला.
मच्छिंद्र मगदूम
सांगरुळ : गाव करवीर तालुक्यातील आरडेवाडी. डोंगराच्या कडेला असलेली फक्त सहा गुंठे जमीन. त्यात पावसाळ्यातच फक्त गवत येते. त्याची किंमत केली तरी कसेबसे हजार-दोन हजार रुपये; परंतु ते कापायचे कुणी म्हणून सख्खे चुलतभाऊ एकमेकांशी भिडले आणि एका उमद्या तरुणाचा त्यात हकनाक बळी गेला.
दोन्ही कुटुंबांतील पंधरा जणांना अटक झाली असून त्यांना आता चार-पाच वर्षे न्यायालयाच्या चकरा माराव्या लागणार आहेत. एक मराठा...लाख मराठा म्हणून एकीची मूठ आवळणाऱ्या मराठा समाजातील असे भाऊबंदकीतील वाद कसे संपवायचे, याचाच विचार होण्याची आता गरज आहे.
आरडेवाडी हे सातशे लोकवस्तीचे गाव. हे गाव डोंगराच्या पायथ्याला असल्यामुळे बागायती क्षेत्र कमी यामुळे बहुतांशी लोक हे शहरातील खासगी कंपनीमध्ये कामाला जातात. गावचे शेतीचे क्षेत्रफळ अल्प असल्याने अल्पभूधारक शेतकरी आहेत. वाकरेकर भावकीची एकूण आठ कुटुंबे. सख्खे चुलतभाऊ असणाऱ्या कुटुंबीयांमध्ये काही दिवसांपूर्वी सहा गुंठे डोंगरातील जमिनीतील गवत कापण्यावरून मारामारी झाली. त्यामध्ये एका २४ वर्षे वयाच्या एकुलत्या तरुणाचा खून झाला तर दोघे गंभीर जखमी आहेत.
या घटनेत गावांतील, पै-पाहुण्यांची किंवा जाणत्या लोकांनी सामंजस्याची भूमिका घेऊन वाद मिटवायला हवा होता; परंतु तसे घडले नाही. भाऊबंदकीचा शाप हा एक समाजाला लागलेला कलंक आहे. दोन्ही कुटुंबांत बरीच वर्षे या जमिनीसाठी वाद चालू होता. एका कुटुंबात वीस तर दुसऱ्या कुटुंबात चौदा सदस्य. ही ताकद समजून दोन्ही कुटुंबे एकमेकांचा द्वेष करू लागली. त्यातून दोन्ही कुटुंबांत टोकाची ईष्या निर्माण झाली.
पाय कुणी मागे घ्यायला तयार नव्हते. शेतीवरून दोन्ही कुटुंबांत अनेक वेळा यापूर्वीही वाद झाले. एकमेकांच्या पिकांची नासधूस करण्यासारखे प्रकार घडले आणि आता शेवटचे टोक गाठले गेले व एक उमलणारे आयुष्य संपले. आता दोन्ही कुटुंबांतील सर्व कर्ती माणसे अटकेत असून घरात फक्त महिला आणि लहान मुलेच आहेत.
त्यामुळे फक्त गवताच्या चार पेंढ्यांसाठी हा वाद करून या दोन कुटुंबांना काय मिळाले याचा विचार करण्याची गरज आहे. या घटनेतून समाजाने बोध घेऊन अशा घटना कशा टाळता येतील हे पाहिले पाहिजे. मराठा समाजापुढील हे महत्त्वाचे आव्हान आहे.