जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी-मेरी कहानी है...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 01:24 AM2019-07-03T01:24:58+5:302019-07-03T01:25:58+5:30
: ‘एक प्यार का नगमा है... मौजों की रवानी है; जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी-मेरी कहानी है..., सत्यम् शिवम् सुंदरम्, हसता हुआ नुराणी चेहरा अशा अवीट गोडीच्या गीतांची कहाणी... बालपणीच सुरू झालेला सुरांचा प्रवास, सी. रामचंद्र यांच्यासारखे गुरू
कोल्हापूर : ‘एक प्यार का नगमा है... मौजों की रवानी है; जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी-मेरी कहानी है..., सत्यम् शिवम् सुंदरम्, हसता हुआ नुराणी चेहरा अशा अवीट गोडीच्या गीतांची कहाणी... बालपणीच सुरू झालेला सुरांचा प्रवास, सी. रामचंद्र यांच्यासारखे गुरू, राज कपूर यांचा संगीत सेन्स, लतादीदींची आदरयुक्त भीती, मोहम्मद रफींचा जिव्हाळा आणि किशोरकुमार यांचा अवखळपणा, भारतीय व पाश्चात्त्य संगीताचे जुळलेले स्वर आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीच्या गाजलेल्या गाण्यांच्या दुनियेत नेत ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा यांनी रसिकांना स्वरधारांमध्ये चिंब भिजवले.
केशवराव भोसले नाट्यगृहात ब्राह्मण बिझनेस फोरमच्या वतीने आयोजित ‘सूर संगम’ कार्यक्रमात प्यारेलाल यांनी आपला संगीतमय जीवनप्रवास, लक्ष्मीकांत यांच्यासोबत असलेला स्नेह आणि प्रत्यक्ष संगीताद्वारे गीतांची कहाणी उलगडली. यावेळी त्यांच्या पत्नी सुनीला शर्मा, दिलीप गुणे , मिलिंद गुणे, सचिन जगताप, केदार गुळवणी, धनंजय गोडसे, प्रकाश वर्तक उपस्थित होते.
प्यारेलाल संगीत कारकिर्दीला उजाळा देताना म्हणाले, माझे वडील मिलिटरी बँडमध्ये बँडमास्टर होते. त्यांना पाश्चात्त्य संगीत येत होते. त्यांनी मला संगीताची गोडी लावली. वयाच्या १२ व्या वर्षी मी पहिल्यांदा स्टुडिओत पाऊल ठेवले. सी. रामचंद्र यांच्याकडे काम करू लागलो. दरम्यान, लक्ष्मीकांत यांच्याशी स्नेह जुळले. ‘पारसमणी’ हा आमचा पहिला चित्रपट. राज कपूर, मनोजकुमार यांच्यासोबत आम्ही खूप चित्रपटांसाठी काम केली. राज कपूर यांना संगीताची खूप चांगली जाण होती. त्यांच्या सत्यम् शिवम् सुंदरम् या गीतासाठी ८५ वादक आणि ४० गायक कोरसला होते. लता मंगेशकर यांच्यासोबत काम करायचे म्हणजे आम्हाला खूपच काळजी घ्यावी लागायची. त्या सुराला एकदम पक्क्या; त्यामुळे भीती वाटायची. गीतकार आनंद बक्षी म्हणजे एकदम मुक्तच्छंद व्यक्तिमत्त्व.
आम्ही या क्षेत्रात चाचपडत असतानाही महंमद रफी आमच्यासाठी वेळ देऊन गायचे. किशोरकुमार यांचा अवखळपणा गीतातूनही उतरायचा. लक्ष्मीकांत आणि मी म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू होतो. गीतातून आमचं आयुष्य म्हणजे ‘जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है...’ असं होतं. आजही त्यांच्या आठवणीने डोळे भरून येतात. मंगेश वाघमारे यांनी मुलाखत घेतली.
सी. रामचंद्र यांच्या आशीर्वादाने यश
प्यारेलाल यांनी ‘दोस्ती’ चित्रपटाच्या संगीतासाठी मिळालेल्या फिल्मफेअर पुरस्काराची आठवण सांगितली. ते म्हणाले, त्यावेळी आमची संगीत कारकिर्द हेलकावे खात होती. एक दिवस आम्ही दुपारी रूमवर निवांत झोपलो होतो तेव्हा दारावर जोराची थाप आणि पाठोपाठ ‘अरे गाढवांनो, झोपलाय काय, उठा, तुम्हाला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला!’ हे शब्द ऐकू आले आणि ही बातमी देणारे होते आमचे गुरू सी. रामचंद्र. त्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही यश संपादन करू शकलो.