आॅनलाईन फसवणुकीने आयुष्यच ‘आॅफ’

By admin | Published: February 3, 2016 12:42 AM2016-02-03T00:42:37+5:302016-02-03T00:45:00+5:30

अनेकांचे संसार उघड्यावर : एकाही गुन्ह्याची उकल नाही; बिहार, झारखंड, दिल्ली येथून मोबाईल कॉल

Life is the only way of fooling us | आॅनलाईन फसवणुकीने आयुष्यच ‘आॅफ’

आॅनलाईन फसवणुकीने आयुष्यच ‘आॅफ’

Next

एकनाथ पाटील ल्ल कोल्हापूर
एसएमएस, ई-मेल, फेसबुक, टीव्ही चॅनेल, आदी सोशल नेटवर्कच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात आॅनलाईन फसवणुकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या गुन्ह्यांतील आरोपींचे नाव, पत्ताच नोंद नसल्याने फक्त मोबाईल सीमद्वारे त्यांचा शोध घ्यावा लागत आहे. बिहार, झारखंड, दिल्ली येथून हे कॉल येतात. या कॉलचे लोकेशन दर दोन दिवसांनी बदलत असल्याने तांत्रिक अडचणीमुळे एकाही गुन्ह्याची उकल अद्याप झालेली नाही. या फसवणुकीमध्ये भरकटलेल्या अनेक व्यक्तींचे संसार मात्र उघड्यावर पडले आहेत. अनेकांनी आपल्या जीवनाची यात्राही संपविली आहे.
झटपट पैसा मिळविण्याच्या हव्यासापोटी अनेक सुशिक्षित लोक टीव्ही, मोबाईलवरील बोगस जाहिरातींच्या आमिषाला बळी पडल्याचे चित्र आहे. बहुतांश व्यक्तींच्या मोबाईलवर विजापूर, राजस्थानमध्ये खुदाई करताना सोन्याचा हंडा सापडला आहे. त्यामध्ये दोन ते चार किलो सोन्याचे कॉईन आहेत. आमच्याकडे पैसे नसल्याने ते कमी दरात विकणार आहोत. हवे असल्यास विशिष्ट ठिकाणी येण्यास सांगितले जाते. या खोट्या आमिषाला अनेकजण बळी पडले आहेत. नामांकित टीव्ही चॅनेलवर हिरो-हिरॉईनचे चेहरे ओळखा, अशी जाहिरात केली जाते. त्यामध्ये मोबाईल क्रमांक दिला जातो. एसएमएस किंवा फोन करून उत्तर द्या, अशी सूचनाही केली जाते. अगदी सोपे प्रश्न असल्याने अनेक लोक फावल्या वेळेत हे चेहरे ओळखून संबंधित नंबरवर संपर्क साधतात. काही क्षणात त्यांना संदेश येतो : तुम्ही विजेते ठरला असून तुमचा बँक खाते नंबर कळवा. त्यानंतर त्या व्यक्तीला विश्वासात घेत त्याच्याकडून पैसे उकळले जातात. अशाच पद्धतीने महेश सूर्यवंशी हेदेखील १४ लाखांना फसले. सर्व बाजूंनी खचलेल्या सूर्यवंशी यांनी न्याय मिळत नसल्याच्या निराशेपोटी अखेर जीवनच संपविले. जिल्ह्यात साधारणपणे आॅनलाईन फसवणुकीचे शेकडोंच्या वर गुन्हे दाखल आहेत. अतिशय गुंतागुंतीचे गुन्हे असल्याने त्यांचा अद्यापही तपास पूर्ण झालेला नाही.
अनेकांनी सोसायटी, बँकेतून, शेतीवर, दागिन्यांवर कर्ज काढून एजन्सींच्या बँक खात्यांवर लाखो रुपये भरले आहेत. आता ते भिकेकंगाल बनल आहेत.
अशी होते फसवणूक
एका पेट्रोलियम कंपनीमधून सूरज पद्माकर हिरवे (रा. कोडोली, ता. पन्हाळा) यांच्या ई-मेलवर आपण पाच कोटी रुपये जिंकले असून, ती रक्कम तुमच्या बँक खात्यावर जमा करावयाची आहे. त्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा, असा मेल पाठविला होता. यावरून हिरवे यांनी कंपनीला ई-मेलद्वारे संपर्क साधत पाच कोटींच्या आमिषापोटी त्यांच्या आयसीआयसीआय बँकेत वेगवेगळ्या अकौंटवर सुमारे १५ लाख रुपये भरले. एस.पी.एम. टुल्स, इचलकरंजी या कंपनीमध्ये अकौंटंट म्हणून काम करणाऱ्या राघवेंद्र मल्हारभट रोट्टी (रा. कबनूर, ता. हातकणंगले) यांना एका अनोळखी व्यक्तीने मोबाईलवरून आपण बँक आॅफ बडोदामधून बोलतोय, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करीत त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर पासवर्डचा उपयोग करून त्यांच्या खात्यातील सुमारे ७२ लाख रुपये काढले.
फ्रेंडशिपचा बनाव
फे्रंडशिप क्लबतर्फे कॉलेज गर्लशी मैत्री करण्यासाठी मोबाईलवर संपर्क साधा, अशी जाहिरात करून तरुणांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. आजही महाविद्यालयीन तरुण या आमिषांना बळी पडत आहेत. अनेक तरुणांनी घरातील दागिदागिने चोरून, प्रसंगी वडिलांच्या पॉकेटमनीतील पैसे घेऊन हौस भागविण्याचा प्रयत्न केला आहे.
पोलिसांकडून जनजागृत्ती
आॅनलाईन फसवणुकीचे आरोपी हे महाराष्ट्राबाहेरील असल्याने अनेक टीम या रिकाम्या हाताने परतल्या आहेत. तपासकामासाठी पैसा नाही, आरोपींचे लोकेशन नाही; त्यामुळे अशा गुन्ह्यांमध्ये आजपर्यंत एकाही आरोपीस अटक झालेली नाही. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांत जनजागृती करण्यावर भर दिला आहे. बँक व्यवस्थापक, कॅशिअर यांची बैठक घेऊन महाराष्ट्राबाहेरील बँक खात्यावर कोणी व्यक्ती पैसे भरण्यास आली तर त्यांचे प्रबोधन करा; त्यांना या आमिषापासून रोखा, असे मार्गदर्शन केले जात आहे.
टॉवरच्या नावाखाली लूट
काही बोगस एजन्सींनी सर्व मोबाईल कंपन्यांचे थ्री जी आणि फोर जी टॉवर लावण्यासाठी जमीन, प्लॉट, मकान, छत पाहिजे, टॉवर लावा आणि ९५ लाख अ‍ॅडव्हॉन्सबरोबर ९५ हजार मासिक भाडे मिळवा, तेही ४८ तासांत, अशी जाहिरात करून ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढून लाखो रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारी आहेत.
 

मोबाईल, फेसबुक, ई-मेलचा काही लोक गैरफायदा घेऊ लागल्याने आॅनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांत वाढ होत आहे. हे गुन्हे रोखण्यासाठी लोकांत जागृती करण्याचे काम पोलीस दल करीत आहे. नागरिकांनी निनावी फोनच्या आमिषाला बळी पडू नये.
- सुशीलकुमार वंजारे,
पोलीस उपनिरीक्षक (सायबर ब्रँच)

Web Title: Life is the only way of fooling us

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.