लिफ्टच्या बहाण्याने महिलेची चेन लंपास, झटापटीत महिला जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 02:31 PM2019-07-01T14:31:40+5:302019-07-01T14:31:52+5:30
ताराराणी चौकापासून तावडे हॉटेलपर्यंत महिलेस दुचाकीवर लिफ्ट देणाऱ्या तरुणाने या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी हिसकावून पलायन केले.
कोल्हापूर : ताराराणी चौकापासून तावडे हॉटेलपर्यंत महिलेस दुचाकीवर लिफ्ट देणाऱ्या तरुणाने या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी हिसकावून पलायन केले. सोमवारी सकाळी हा प्रकार घडला. झटापटीत रस्त्यावर ढकलून दिल्याने महिला गंभीर जखमी झाली. कविता कुमार आवटी (वय ४३ रा. आष्टा वाळवा, जि.सांगली) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत माहिती अशी, सांगली जिल्ह्यातील आष्टा-वाळवा येथे राहणाऱ्या कविता आवटी या शिवाजी पार्क येथील डॉ. आर. सी. पाटील यांच्याकडे स्वयंपाकी म्हणून काम करतात. सकाळी काम झाल्यानंतर त्या पुन्हा गावी जातात. त्याच्या पतीने पाच वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्यांना दोन मुले असून घरची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
सोमवारी सकाळी ८.४५ वाजता कविता आवटी या गावी जाण्यासाठी ताराराणी चौकात अयोध्या हॉटेलच्या दारात थांबल्या होत्या. नेहमीप्रमाणे त्या एखाद्या दुचाकीस्वारकडे तावडे हॉटेलपर्यंत सोडण्यासाठी लिफ्ट मागत होत्या. २२-२४ वर्ष वयोगटातील एक दुचाकीस्वार तेथे आला. त्याने आवटी यांना दुचाकीवर घेतले. तावडे हॉटेलजवळ गेल्यानंतर दुचाकीस्वार तरुण दुकानात गेला. तेथून काहीतरी वस्तू घेऊन तो दुचाकीजवळ आला. त्यानंतर या महिलेस दुचाकीवर बसवून पुलावरून मुख्य रस्त्यावर नेले.
तेथे महिलेस खाली उतरून तिच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चेन हिसडा मारून काढून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने विरोध केला. या झटापटीत महिलेस ढकलून दिल्याने ती खाली पडली. तिच्या डोके, चेहरा व हातास जखमा झाल्या. त्यानंतर चोरटा चेन घेवून पळून गेला. कविता आवटी या रस्त्यावर रडत बसल्या होत्या. रिक्षा चालकाने त्यांना सीपीआर रुग्णालयात आणून सोडले. उपचार घेतल्यानंतर या महिलेने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.