जूनमध्ये लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन..!

By admin | Published: April 7, 2017 12:26 AM2017-04-07T00:26:55+5:302017-04-07T00:26:55+5:30

चित्रनगरीचे काम टप्प्यात : पदाधिकारी, व्यावसायिकांनी केली पाहणी

Light, camera, action .. in June! | जूनमध्ये लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन..!

जूनमध्ये लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन..!

Next



कोल्हापूर : ‘मराठी चित्रपटांची गंगोत्री’ असलेल्या कोल्हापुरातील चित्रपटसृष्टीसाठी एकमेव आशेची पालवी असलेल्या कोल्हापूर चित्रनगरीचे पहिल्या टप्प्यातील १२ कोटींची विकासकामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. जून महिन्यात येथे चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, गुरुवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह स्थानिक चित्रपट व्यावसायिकांनी चित्रनगरीच्या विकासकामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
अनेक वर्षे वनवासात असलेल्या येथील चित्रनगरीचे रूपडे आता पालटले आहे. बारा कोटींच्या निधीतून पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण होत आली असून दुसऱ्या टप्प्यासाठी सोळा कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात जुन्या लोकेशन्सच्या डागडुजीसह पाटलाचा वाडा, बंगला, पोलिस स्टेशन, कोर्टाची इमारत, दवाखाना, महाविद्यालय अशा पाच ते सहा नवीन लोकेशन्स तयार झाली आहेत. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत चित्रनगरीत प्रत्यक्ष चित्रीकरणाला प्रारंभ होणार आहे. चित्रीकरणाला मिळणारा प्रतिसाद पाहून लगेचच पुढील टप्प्यातील कामांनाही प्रारंभ होणार आहे.
चित्रनगरीच्या पायाभूत सुविधांसाठी मार्च २०१६ मध्ये निविदा प्रसिद्ध झाली. त्यातून पाटलाचा वाडा, स्टुडिओचे विस्तारीकरण, सुरक्षा रक्षक केबिन आदी सुविधा उपलब्ध झाल्या. त्याशिवाय नवीन डोम हाऊस, स्ट्रक्चरल रिपेअरिंग, नवीन गार्डन लोकेशन्स, अंतर्गत ( पान ६ वर)

जूनमध्ये चित्रिकरणाचा मुहूर्त!
प्रवेशद्वार, वातानुकुलन यंत्रणा, जिम्नॅशियम बिल्डिंगसह चेंजिंग रूम, टॉयलेट सुविधा, फायर फायटिंग सिस्टीम, कंपौंड वॉलसाठी अशा विविध निविदा प्रसिद्ध झाल्या. काही निविदांना प्रतिसाद मिळाला नसल्याने फेरनिविदा काढल्या. अनेक अडचणींचा सामना करून अखेर पहिल्या टप्प्यातील काम आता पूर्णत्वाकडे आले आहे.
दरम्यान, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह चित्रपट व्यावसायिकांनी गुरुवारी चित्रनगरीला भेट देऊन पाहणी केली. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उपाध्यक्ष धनाजी यमकर, माजी कार्यवाह भालचंद्र कुलकर्णी, संजय मोहिते, शरद चव्हाण, बाळा जाधव, अरुण भोसले, सुरेंद्र पन्हाळकर, सुरेखा शहा, बबिता काकडे, शोभा शिराळकर, छाया सांगावकर, विजय शिंदे, प्रकल्प अधिकारी दिलीप भांदिगरे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
दोन हजार झाडांची लागवड
पहिल्या टप्प्यातील विकासकामांतर्गत असलेले चार किलोमीटरचे अंतर्गत रस्तेही पूर्ण झाले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी आता स्ट्रीट लाईट उभारण्याचे काम सुरू होणार आहे. दुसरीकडे पर्यावरणदिनाचे औचित्य साधून जूनमध्ये परिसरात दोन हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
सूचनांचा व्हावा विचार
दुसऱ्या टप्प्यात प्रवेशद्वारासमोरच १५० बाय १५० चा मोठा स्टुडिओ उभारण्यात येणार आहे. याशिवाय रेल्वे स्टेशन, सेंट्रल एसी, फायर फायटिंग सिस्टीम, स्वीमिंग पूल अशी विविध कामे करण्यात येणार आहे. त्यात कलाकारांनी मोठा वाडा, चाळ, कलाकारांसाठी गेस्ट रूम अशा सुविधा असाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. एकदा काम पूर्ण झाले की राहिलेल्या त्रुटी लवकर पूर्ण करता येत नाहीत. त्यामुळे या सूचनांचा विचार व्हावा, अशी अपेक्षा भालचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी, अभिनेता आनंद काळे, स्वप्निल राजशेखर यांनीही विविध सूचना मांडल्या.

Web Title: Light, camera, action .. in June!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.