‘देशी’च्या माध्यमातून जगण्याच्या संघर्षावर प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 01:19 AM2020-02-09T01:19:13+5:302020-02-09T01:20:20+5:30

पुरस्कारासाठी ३५ लघुपटांची शॉर्टलिस्ट करण्यात आली होती. त्या हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज कलावंतांचेही लघुपट होते. त्यातून ‘देशी’ला मिळालेला हा सन्मान आमच्या टीमचा उत्साह दुणावणारा आहे.

 Light on the struggle to live through the 'native' | ‘देशी’च्या माध्यमातून जगण्याच्या संघर्षावर प्रकाश

‘देशी’च्या माध्यमातून जगण्याच्या संघर्षावर प्रकाश

Next

इंदुमती गणेश ।

कोल्हापूर म्हणजे चित्रपटसृष्टीचे माहेरघर. कोल्हापुरातील वडणगे या गावातील रोहित कांबळे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘देशी’ या लघुपटाला फिल्मफेअरचा प्रेक्षक पसंती पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्ताने कोल्हापूरच्या मातीत रुजलेला चित्रपट संस्कार आणि सर्वसामान्य तरुणांमधील कौशल्यपूर्ण निर्मितीवर पुन्हा एक मोहोर उमटली... या पुरस्काराचे औचित्य साधून रोहित कांबळे यांची घेतलेली ही चर्चेतील मुलाखत..

प्रश्न : अत्यंत खडतर परिस्थितीत लघुपट या क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली?
उत्तर : मी मूळचा कागलचा; पण शिक्षणासाठी आई काम करीत होती, त्या कुशिरे येथील आश्रमशाळेत प्राथमिक शिक्षण घेतलो. वडील गवंडी काम करायचे. मी, भाऊ, बहीण असं कुटुंब. घरची परिस्थिती अतिशय बेताची; झोपडीवजा घरात राहायचो. पण शिक्षणाची आवड होती. शिकण्याची प्रेरणा आईनेच दिली. आठवी दरम्यान शिक्षक मिलिंद यादव यांचा सहवास लाभला आणि त्यांनी माझ्या हातात पहिल्यांदा कॅमेरा दिला. तेव्हापासून फोटोग्राफीची आवड निर्माण झाली. हेच माझ्या उदरनिर्वाहाचे साधनही झाले. यातूनच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. पुढे शिवाजी विद्यापीठात पत्रकारितेची पदवी घेतली. ‘नेट’ झालो... आणि तिथून माझा डॉक्युमेंटरीच्या दिशेने प्रवास सुरू झाला.

प्रश्न : लघुपट निर्मितीला सुरुवात कशी झाली?
उत्तर : सुरुवातीला मी अ‍ॅबस्ट्रॅक पद्धतीने दीड, दोन मिनिटांचे लघुपट बनवू लागलो. त्यानंतर व्हु ईज पोल्युटर या लघुपटाला वसुंधरा फि ल्म फेस्टिव्हलमध्ये प्रथम बक्षीस मिळाले. त्यानंतर राज्य शासनातर्फे आयोजित ‘महाराष्ट्र माझा शेतकरी राजा’ या अंतर्गत घेण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेत शासनाची कल्पना या विषयावरील लघुपटाला दुसरा क्रमांक मिळाला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान मिळाला. त्यामुळे आत्मविश्वास वाढला.


प्रश्न : देशी लघुपटाबद्दल काय सांगशील?
उत्तर : मला कायम वाटायचं की जात-धर्माशिवाय माणूस जगू शकत नाही का? मग या विचारातून ‘देशी’ची कथा सुचली. वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या मुलीला शाळेत प्रवेश घेताना येणाºया अडचणी आम्ही या २० मिनिटांच्या लघुपटात मांडल्या आहेत. त्याचे चित्रीकरण कोल्हापूर आणि पन्हाळ््यात झाले आहे. चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळ प्रस्तुत आणि राजेंद्रकुमार मोरे यांनी याची निर्मिती केली. लेखन, दिग्दर्शन माझे आहे.


कलात्मक निर्मितीची जाणीव
आपण अधिक दर्जेदार, कलात्मक चित्रपटांची निर्मिती केली पाहिजे, याची जाणीव झाली आहे. आता नागरिकांच्याही आमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. ते पूर्ण करताना कोल्हापूरला लाभलेला मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ परत आणण्यासाठी प़्रयत्न करायचा आहे.

Web Title:  Light on the struggle to live through the 'native'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.