लाईक, शेअर अन् कमेंटस्... -दृष्टीक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 01:03 AM2019-01-22T01:03:56+5:302019-01-22T01:08:37+5:30
सध्याचे युग हे डिजिटलचे आहे. या युगात कधी कशाला प्रसिद्धी मिळेल हे सांगता येत नाही. आता हेच पहा ना, कोंबडीचे एक साधे अंडे इन्स्टाग्रामवर इतका धुमाकूळ घालतंय की, ते जगात सर्वाधिक लाईक झालेले अंडे म्हणून प्रसिद्ध पावलंय. हा एक जागतिक विक्रम आहे.
चंद्रकांत कित्तुरे
सध्याचे युग हे डिजिटलचे आहे. या युगात कधी कशाला प्रसिद्धी मिळेल हे सांगता येत नाही. आता हेच पहा ना, कोंबडीचे एक साधे अंडे इन्स्टाग्रामवर इतका धुमाकूळ घालतंय की, ते जगात सर्वाधिक लाईक झालेले अंडे म्हणून प्रसिद्ध पावलंय. हा एक जागतिक विक्रम आहे. सोशल मीडियाचे जे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत, त्यामध्ये व्हॉटस्अॅप, फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टाग्राम, आदींचा समावेश आहे. १९ वर्षांचा व्हायरल मार्केटिंग गुरू ईशान गोयल याने अंड्याची ही पोस्ट शेअर केली आहे. सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या अंड्यामध्ये असे काय वेगळे आहे, तर काहीच नाही. गंमत म्हणून त्याने ते पोस्ट केले आणि हे अंडे इतके व्हायरल करा की, त्याचा विक्रम झाला पाहिजे, अशा आशयाची एक ओळ खाली टाकली. झाले..नेटकऱ्यांमध्ये त्याला लाईक आणि कमेंटस् करत फॉरवर्ड करण्याची अहमहमिका लागली. बघता बघता ८४ लाख फॉलोअर्स, फक्त २ पोस्टस् आणि लाईक्स-कमेंटस मिळून अब्जावधीचा प्रतिसाद या अंड्याला मिळाला. प्रतिसाद देणाºयांना यातून काय मिळाले माहीत नाही; पण एखाद्याने ठरवून आपल्याला ‘मामा’ बनवायचे ठरविले तर त्याला नेटकरी कसे बळी पडतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.
सध्याच्या गतिमान आणि धावपळीच्या जगात माणसाकडे रिकामा वेळ नाही असे म्हटले जाते. सहज बोलता बोलता आपण अरे, हल्ली वेळच म्हणत नाही कशाला, असे बोलून जातो; पण त्याचवेळी आपण सोशल मीडियावर किती वेळ घालवतो याचा कधीही विचार करत नाही. अमेरिकेतील एका सर्वेक्षणानुसार अमेरिकन नागरिक वर्षातील ६१ प्रकारे सोशल मीडियावर आपला वेळ घालवतात. याचाच अर्थ आपल्या आयुष्यातील खूप मोठा वेळ सोशल मीडिया, दूरचित्रवाणी आणि व्हिडीओ गेमवर खर्च करतात. भारतातही फारसे वेगळे चित्र असेल असे वाटत नाही. भारतात तर प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आला आहे आणि जिओने इंटरनेटच्या माध्यमातून जिवाला जगभर भटकंती करायला स्वस्तात मोकळीक दिली आहे. त्यामुळे युवा पिढी सोशल मीडियावर किती वेळ वाया घालवते याची मोजदादच करता येत नाही.
अगदी अंथरूणातही डोक्यावर पांघरूण घेऊन आत व्हॉटस्अॅप किंवा फेसबुक पाहणारे महाभाग कमी नाहीत. दोन वर्षांपूर्वी भारतातील नोकरदारांचा सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये नोकरदार मंडळी आपला कामाचा ३२ टक्के वेळ सोशल मीडियावर घालवितात. उर्वरित वेळेत ते कार्यालयीन कामकाज पहातात, असा या सर्व्हेचा निष्कर्ष होता. हाच वेळ त्यांनी कार्यालयीन कामकाजासाठी वापरला तर कशाला कामे मागे राहतील. बॉसची बोलणी खावी लागणार नाहीत. तसेच शासकीय कार्यालयातील जनतेची कामेही अडणार नाहीत. युवा पिढीने सोशल मीडियावर सक्रिय राहू नये असा याचा अर्थ नाही; पण जीवनात लक्ष्य ठरवून कोणत्या गोष्टीसाठी किती वेळ द्यावयाचा हे निश्चित केले पाहिजे.
सध्या शारीरिक व्यायाम, खेळ याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तरुण वयातच अनेक आजार जडत असल्याच्याही तक्रारी आहेत. या गोष्टीसाठी आपण वेळ राखून ठेवला तर का राहणार नाही प्रकृती तंदुरुस्त? त्याचप्रमाणे सोशल मीडियावर आपण काय पहावे, काय नको याची जाणीव असायला हवी. खरेतर याबाबत प्रबोधनाचीच गरज आहे. अनेकजण येणाºया पोस्ट फारसा विचार न करताच फॉरवर्ड करीत असतात. काही पोस्ट आक्षेपार्ह असतात. न वाचता ती आपल्याकडून फॉरवर्ड झाली तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. प्रसंगी जेलची हवाही खावी लागते. सोशल मीडियामुळे वाचनाची सवय मोडली गेली आहे. तरुण पिढी वाचतच नाही, असे सर्रास म्हटले जाते; पण हे खरे नाही. सोशल मीडियावर ती वाचतच असते. फक्त काय वाचायचे याचे भान तिला नसते. ते आणून देण्याची, काय वाचावे, काय पहावे हे शिकविण्याची गरज आहे.
सध्या भारतात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. या निवडणुकीतील प्रचाराची पद्धत आता पार बदलून गेली आहे. सोशल मीडिया हेच प्रचाराचे प्रमुख अस्त्र बनू पहात आहे. यातूनच आपल्याला हव्या तशा बातम्या व्हायरल केल्या जातात आणि राजकीय नेत्यांचे भक्त त्या फॉरवर्ड करीत राहतात. अशा बातम्यांचा फेकन्यूजच्या रुपाने आता महापूर येईल. या महापूरात खरे काय, खोटे काय हे जाणून घेण्याची क्षमता मतदारांकडे असली पाहिजे. खरे काय खोटे काय याची पडताळणी केल्याशिवाय अशा पोस्टवर लाईक, शेअर अन् कमेंटस् करू नये.