लिंबूच्या दरात दुप्पटीने वाढ

By admin | Published: April 2, 2017 05:44 PM2017-04-02T17:44:28+5:302017-04-02T17:46:10+5:30

तुरडाळ, हरभराडाळ वधारली : फळांची आवक वाढली

Lime prices doubled | लिंबूच्या दरात दुप्पटीने वाढ

लिंबूच्या दरात दुप्पटीने वाढ

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर : उन्हाच्या वाढलेल्या कडाक्यामुळे शीतपेयांची मागणी वाढली असून परिणामी लिंबूच्या दरात दुप्पटीने वाढ झाली आहे. रसरशीत पिवळे धमक लिंबू दहा रुपयांना दोन, असा दर झाला आहे. तूरडाळ व हरभरा डाळीच्या दरात थोडी वाढ झाली असून फळांची आवकही वाढली आहे. भाजीपाल्याची आवक स्थिर असली तरी दरात थोडी घसरण झालेली आहे.

दिवसें-दिवस उन्हाचा कडाका वाढू लागल्याने थंडगार पेयांची मागणी वाढत आहे. लिंबूची आवक बऱ्यापैकी असली तरी मागणी वाढल्याने दरात एकदम वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात रसरशीत मोठे लिंबू दहा रुपयांना दोन आहेत. गेल्या आठवड्यात लिंबूचे चुमड्याचा दर चारशे रुपये होता, तो आता सातशे रुपयांपर्यंत पोहोचला आहे. लिंबूबरोबर फळांच्या मागणीतही वाढ झाली असून कलिंगडे, मोसंबी, संत्री, द्राक्षे, चिक्कू, सफरचंदची आवकही चांगली आहे.

गतआठवड्याच्या तुलनेत मोसंबी, संत्री, चिक्कू, कलिंगडच्या दरात वाढ झाली आहे. मोठ्या कलिंगडचे ढीग सरासरी सहाशे रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. द्राक्षांची आवक जेमतेम असून घाऊक बाजारात वीस रुपये किलोपर्यंत दर आहे. सफरचंदने आपला दर कायम राखला असून दोन हजार ते चोवीसशे रुपये पेटीचा दर राहिला आहे. कैऱ्यांची आवकही वाढली असून हिरवा तोतापुरीही यंदा लवकर बाजारात आला आहे.

भाजीपाल्याची आवक स्थिर आहे, पण दरात थोडी घसरण झाली आहे. कोबी, वांगी, टोमॅटो, ढब्बू, ओला वाटाणा, कारली, वरणा, दोडक्याच्या दरात घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात पांढरी वांगी वीस तर तांबडी वांगी दहा रुपये किलो आहेत. कोंथिबीरच्या दरात थोडी वाढ झाली असून वीस रुपये पेंढी दर आहे. कांद्याचे दर थोडेसे वधारले आहेत, तरीही किरकोळ बाजारात वीस रुपयाला दीड किलो कांदा मिळत आहे. बटाटा व लसणाचे दर स्थिर आहेत.

आठवडी बाजार दुपारी ओस


सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाचा तडाका जाणवत असल्याने दुपारी बारानंतर घराबाहेर पडणे मुश्कील होते. उन्हामुळे लक्ष्मीपुरी आठवडा बाजार दुपारी दोनपर्यंत अक्षरश: ओस पडल्यासारखा दिसत होता.

हापूसची आवक वाढली


रत्नागिरी’, ‘देवगड’सह कर्नाटकातून हापूस आंब्यांची आवक जोरात सुरू झाली आहे. उष्म्यामुळे आंबा बागा अडचणीत आल्या असल्या तरी पीक चांगले असल्याने आवक वाढल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. कोल्हापूर बाजारपेठेत रोज हापूस व पायरीच्या दीड हजार पेट्या तर सहा हजारापेक्षा अधिक बॉक्सची आवक होत आहे.
हापूसचा दर दाम असा-


आंबा दर रु पयात सरासरी दर
हापूस ८०० ते २२०० पेटी १५००
हापूस १०० ते ४५० बॉक्स ३००
पायरी १२० ते २५० बॉक्स १७५
रायवळ ६० ते १२० पेटी ९०

Web Title: Lime prices doubled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.