रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा देण्यावर मर्यादा--भुदरगड तालुक्याचे दुखणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 11:39 PM2019-05-09T23:39:15+5:302019-05-09T23:39:55+5:30

भुदरगड तालुका हा डोंगराळ, दुर्गम भागात वाड्यावस्त्यांत विखुरल्याने गारगोटी वगळता इतरत्र शासकीय दवाखाने हेच रुग्णांचे तारणहार आहेत. या दवाखान्यात गेली अनेक वर्षे रिक्तपदांमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या डोळेझाकपणामुळे रुग्ण आणि आरोग्य विभागाला त्रास

Limitation on giving health care to vacant posts - Bhudargad taluka pain | रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा देण्यावर मर्यादा--भुदरगड तालुक्याचे दुखणे

रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा देण्यावर मर्यादा--भुदरगड तालुक्याचे दुखणे

Next
ठळक मुद्दे लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांकडून डोळेझाक; जनतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र हेच तारणहार

शिवाजी सावंत ।
गारगोटी : भुदरगड तालुका हा डोंगराळ, दुर्गम भागात वाड्यावस्त्यांत विखुरल्याने गारगोटी वगळता इतरत्र शासकीय दवाखाने हेच रुग्णांचे तारणहार आहेत. या दवाखान्यात गेली अनेक वर्षे रिक्तपदांमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या डोळेझाकपणामुळे रुग्ण आणि आरोग्य विभागाला त्रास सहन करावा लागत आहे. अपुरे कर्मचारी असल्याने आरोग्य सेवा देण्यात या तालुक्यातील आरोग्य विभाग जिल्ह्यात तिसºया क्रमांकावर आहे.

भुदरगड तालुक्याची १ लाख ४९ हजार ६३३ लोकसंख्या असून, ती ११४ वाड्यावस्त्यांत विखुरलेली आहे. या लोकसंख्येचे आरोग्य जपण्यासाठी मडिलगे बुद्रुक, पाटगाव, कडगाव, पिंपळगाव, मिणचे खुर्द येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, बरवे येथे एक आयुर्वेदिक दवाखाना, तर गारगोटी येथे ग्रामीण रुग्णालय हे मुख्य, तर याअंतर्गत ३० उपकेंद्रे आहेत. या दवाखान्यांमध्ये दरवर्षी ६० हजार बाह्यरुग्णांना, तर ५ हजार आंतररुग्णांना उत्तमप्रकारे सेवा दिली जाते. दरवर्षी प्लस पोलिओ, गोवर, क्षयरोग प्रतिबंधक लस, कावीळ, पेंटा १,२,३, याशिवाय डायरिया, मलेरिया यांसारख्या लसीकरणाच्या वेगवेगळ्या लसी दिल्या जातात. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण ७८ टक्के आहे. पाच उपकेंद्रांकडे पाच रुग्णवाहिका आहेत.

हा एवढा मोठा डोलारा सांभाळण्यासाठी गेली अनेक वर्षे पूर्णवेळ तालुका वैद्यकीय अधिकारी नाहीत. इथूनच गळतीला सुरुवात झालेली आहे. अतिरिक्त असलेल्या या डॉक्टरांना दोन ते तीन ठिकाणच्या जबाबदाºया सांभाळाव्या लागतात. दोन-दोन जबाबदाºया सांभाळताना त्यांची आबाळ होते. वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर नवीन डॉक्टरांना सरकारी दवाखान्यात सेवा करण्यात रसनाही. गावपुढारी, काही लोकांच्या त्रासाला कंटाळून अनेक अधिकाऱ्यांनी अवघ्या काही महिन्यांतच इथल्या नोकरीला रामराम ठोकला आहे. परिणामी, ज्येष्ठ डॉक्टरांनाच रुग्णांच्या सेवेचा हा भार वाहावा लागत आहे.


अतिदुर्गम भागाबाबत सापत्नभाव : देसाई
लोकांच्या आरोग्यासाठी काम करणाºया लोकाधारित देखरेख व नियोजन प्रकल्प समन्वयक संस्थेचे अध्यक्ष रवी देसाई म्हणाले, रिक्तपदांबाबत आमच्या संस्थेने शासन आणि प्रशासनाकडे वेळोवेळी विविध बैठका आणि जनसंवादाच्या माध्यमातून गेली सहा वर्षे पाठपुरावा केला आहे. पाठपुरावा करूनदेखील प्रशासन आणि शासन या अतिदुर्गम भागाकडे सापत्नभावाने पाहते हे निषेधार्ह आहे. तरी ही रिक्त पदे तत्काळ भरून रुग्णसेवा सुरळीत न केल्यास आगामी काळात महासंघ व प्रक्रियेच्या माध्यमातून आंदोलनात्मक व कायदेशीर पावले उचलण्यात येणार आहेत.


बारवे, वेसर्डेतील दवाखाने बंदच
बारवे येथील आयुर्वेदिक दवाखाना आणि वेसर्डे येथील तालुका दवाखाना हे वैद्यकीय अधिकारी नसल्याने बंद आहेत. इमारती सुस्थितीत असतानादेखील हे दवाखाने बंद ठेवावे लागले आहेत. या दुर्गम भागातील रुग्णांना अनुक्रमे गारगोटी आणि कडगाव प्राथमिक आरोग्य दवाखान्यात जाण्याशिवाय गत्यंतर नाही. या रुग्णांच्या जिवाशी खेळणाºया प्रशासनाने माणसांच्या आरोग्यासाठी काहीही केलेले नाही. त्यामुळे तालुक्यातील विविध भागांत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे.


सीपीआरचा मोठा आधार
भुदरगड तालुक्यातील दुर्गम भागातील रुग्णांना गारगोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले जाते. येथे उपचार करणे अवघड असल्यास कोल्हापूर येथील सीपीआर किंवा खासगी रुग्णालयात दाखल करण्याशिवाय गत्यंतर नाही. गारगोटीपासून पन्नास किमी अंतरावर जाईपर्यंत अनेकांना वाटेतच आपला जीव गमवावा लागला आहे.


तालुक्यातील रिक्त पदे पुढीलप्रमाणे
मंजूर पदे रिक्त पदे
तालुका वैद्यकीय अधिकारी ०१ ०१
वैद्यकीय अधिकारी १२ ०९
परिचर २२ १०
वाहनचालक ०५ ०३
औषध निर्माता ०६ ०२
आरोग्य सहा. महिला ०८ ०२
आरोग्य सेवक २८ ११
आरोग्यसेविका ४० १७

Web Title: Limitation on giving health care to vacant posts - Bhudargad taluka pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.