कट्टर प्रतिस्पर्ध्यांच्या लढतीत मर्यादित उमेदवार
By admin | Published: September 30, 2015 01:09 AM2015-09-30T01:09:19+5:302015-09-30T01:16:27+5:30
पक्षाच्या उमेदवारीचे बळ : पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा रिंगणात, शेतकरी वर्गाचा कल ठरणार निर्णायक
तानाजी पोवार-कोल्हापूर -शहरी आणि ग्रामीण असा दोन्हीही भास होणारा प्रभाग म्हणून क्रमांक ५३ म्हणजे दुधाळी पॅव्हेलियन होय. सर्वसामान्य मतदारसंख्येने व्यापलेला असा हा प्रभाग होय. गेल्या निवडणुकीत या प्रभागावर महिला आरक्षण होते. त्यामुळे इच्छुकांनी आपल्या पत्नीना निवडणुकीत संधी दिली; पण यंदा हा प्रभाग सर्वसाधारण खुला झाल्याने स्वत: उभारण्याची अनेकांनी व्यूहरचना केली आहे. प्रभागात शेतकरी मतदारांची संख्याही अधिक व निर्णायक असल्याने या मतदारांना आपलेसे करण्यासाठी साऱ्याच उमेदवारांची धावपळ सुरू आहे. प्रभागात पारंपरिक कट्टर वैरी एकमेकांसमोर निवडणुकीत उभे आहेत.
यापूर्वीच्या निवडणुकीत रंकाळा टॉवर, मीराबाग अशी या प्रभागाची नावे होती; पण चालू निवडणुकीत प्रभाग रचनेत बदल झाल्याने या प्रभागाचे नाव ‘दुधाळी पॅव्हेलियन’ असे झाले. त्यामुळे रंकाळा टॉवर म्हणून या प्रभागाची जुनी ओळख पुसली आहे. सध्या या प्रभागात इच्छुक उमेदवारांचे पोस्टरयुद्ध चांगलेच भडकले आहे. त्यात ‘पाठिंबा’, ‘समर्थ साथ’ असे ‘उदो-उदो’ करणारे फलक चौका-चौकांत झळकत आहेत. या प्रभागात विद्यमान नगरसेविका वंदना आयरेकर यांचे पती विश्वास आयरेकर, हेमंत मारुतराव कांदेकर, प्रतापसिंह जाधव, माजी नगराध्यक्ष वसंतराव निगडे यांचे चिरंजीव उदय निगडे तसेच यशवंत सुर्वे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे येथे पक्षाच्या उमेदवारी कोणाला मिळणार यावर विजय निश्चित मानला जातो.
या प्रभागाच्या विद्यमान नगरसेविका वंदना आयरेकर यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या आढाव्यावर त्यांचे पती विश्वास ऊर्फ नाना आयरेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात उतरत आहेत. गेल्या पाच वर्षांत त्यांनी, बालोद्यान, लाईट सुविधा, अद्ययावत शूटिंग रेंज, व्यायाम साहित्य वाटप, रस्ते डांबरीकरण, ड्रेनेज सुविधा, गटर्स, चॅनेल काम पूर्णत्वाचा प्रयत्न केला. पाच वर्षांत सव्वा तीन कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण केली आहेत. नागरी सुविधांचा पाठपुरावा केला आहे. पाच वर्षांतील पत्नीने प्रभागात केलेल्या विकासकामांवर ते पुन्हा मतदारांकडे जात आहेत.
हेमंत कांदेकर यांनी या प्रभागातून भाजप-ताराराणी महायुतीकडे उमेदवारी मागितली आहे. दिवंगत नगरसेवक उमेश कांदेकर यांचे ते भाऊ होय. उमेश कांदेकर हे २००५ मध्ये विद्यमान नगरसेवक होते. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर पोटनिवडणुकीत हेमंत कांदेकर यांना २००९ च्या पोटनिवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते पडली. ते परिसरातील यु. के. ग्रुपचे संस्थापक आहेत. त्यांनी उमेश कांदेकर यांच्या कारकिर्दीतील विकासकामांचा आढावा मतदारांसमोर उचलून धरला आहे.
प्रतापसिंह जाधव हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांच्या पत्नी सरोज जाधव यांनी २०१० च्या निवडणुकीत काँग्रेसकडून विजयासाठी प्रयत्न केले, पण ते विजयाच्या समीप पोहोचले अन् किरकोळ मतांनी त्यांचा पराभव झाला. यंदाच्या निवडणुकीत प्रतापसिंह जाधव यांनी भाजप-ताराराणी महायुतीकडे उमेदवारीची मागणी केली आहे. ते निवडणुकीत नवखे उमेदवार असले तरी त्यांचा प्रभागात चांगला जनसंपर्क आहे.
खतांचे विक्रेते उदय निगडे हेही शिवसेनेच्या तिकिटावर मतदारांचा कौल आजमावत आहेत. ते रंकाळा तालीम मंडळाचे सदस्य आहेत तसेच कोल्हापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वसंतराव निगडे यांचे ते चिरंजीव होत. वसंतराव मोहिते यांनी नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत शहराचा विकासकामांतून चेहरा मोहरा बदलला. तोच धागा पकडून उदय निगडे यांनीही आपली यंत्रणा लावली आहे. त्यांच्या पत्नीने अनुपमा महिला बचतगट, भवानी महिला बचतगटाच्या माध्यमातून महिलांच्यात एकोपा निर्माण केला आहे. त्यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागणी केली आहे.
प्रभागात गवत मंडई परिसरातील रहिवासी यशवंत सुर्वे यांनीही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागतिली आहे.
उमेदवार आणि पक्ष
या प्रभागात गेल्या निवडणुकीत प्रतापसिंह जाधव यांनी काँग्रेसतर्फे पत्नी सरोज जाधव यांना निवडणूक रिंगणात उतरविले होते; पण आता प्रतापसिंह जाधव यांनी भाजप-ताराराणी महाआघाडीस प्रथम प्राधान्य दिले आहे तर हेमंत कांदेकर यांच्या पत्नीने २००९ च्या पोटनिवडणुकीत ‘जनसुराज्य’मार्फत निवडणूक लढविली होती पण यंदा या दोघांनी भाजप-ताराराणी महायुतीकडे उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे या दोघांत प्रथम महायुतीचे तिकीट मिळविणे हेच आव्हान आहे, शिवाय शिवसेनेचे उदय निगडे तसेच यशवंत सुर्वे यांनीही शिवसेनेकडे उमेदवारी मागितली आहे; पण या उमेदवारी मिळविण्याच्या रस्सीखेचमध्ये काँग्रेसचे हात मात्र रिकामाच राहिला आहे. त्यामुळे नाराज उमेदवारांना टिपण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी या प्रभागात जाळे टाकले आहे.