कोल्हापूर हायकर्सकडून लिंगाणा सुळका सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 07:32 PM2020-12-24T19:32:46+5:302020-12-24T19:33:37+5:30
Fort Kolhapur- साहस आणि थराराचा सुरेख संगम म्हणून ओळखला जाणारा दुर्गदुर्गेश्वर रायगडसमोरील उतुंग लिंगाणा सुळका कोल्हापूर हायकर्सच्या गिर्यारोहकांनी यशस्वीपणे सर केला.
कोल्हापूर : साहस आणि थराराचा सुरेख संगम म्हणून ओळखला जाणारा दुर्गदुर्गेश्वर रायगडसमोरील उतुंग लिंगाणा सुळका कोल्हापूर हायकर्सच्या गिर्यारोहकांनी यशस्वीपणे सर केला.
अनुभवी गिर्यारोहकांसाठी लिंगाण्याची चढाई तशी सोपी वाटते. पण नवोदित गिर्यारोहकांना ती एक आव्हानात्मकच मोहीम असते. अशा या खडतर व थरारक मोहिमेमध्ये तरुण, तरुणींसोबत इस्लामपूरच्या सुनीता शहा या ५६ वर्षीय महिलेनेही हा सुळका सर केला. यासाठी कोल्हापूर हायकर्स ग्रुपने शासकीय परवानगी काढून व सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून हा सुळका सर केला.
स्वराज्याचा तुरुंग म्हणून या सुळक्याकडे पाहिले जाते. अशा या आव्हानात्मक, साहसात्मक लिंगाणाची मोहीम कोल्हापूर हायकर्सच्या गिर्यारोहकांनी पहाटे साडेचार वाजता सुरू केली होती. ती सायंकाळी पाच वाजता पूर्ण झाली. तब्बल बारा तास या मोहिमेसाठी लागले. तीन हजार फुटांचा हा सुळका सर करताना त्यात एक हजार फूट रॉक क्लायंबिंग व रॅपलिंग सहभागी गिर्यारोहकांना करावे लागले.
या मोहिमेत गिर्यारोहक सागर नलवडे, प्रशांत राऊत, यशराज हावळ व अक्षय पाटील यांनी तांत्रिक चढाईसाठी मोलाचे सहकार्य केले. तसेच ज्येष्ठ गिर्यारोहक मुकुंद हावळ व युवा गिर्यारोहक सागर पाटील यांनी या मोहिमेस मार्गदर्शन केले. मोहीम पार पाडल्यानंतर सर्व गिर्यारोहकांना एवरेस्टवीर भगवान चावले आणि मोहरे गावचे सरपंच शिवाजी पोटे यांच्याहस्ते सन्मानपत्र देण्यात आले. अशा प्रकारची दुसरी मोहीम २५ जानेवारी २०२० ला पुन्हा घेतली जाणार आहे.